
संतोष आंबळेचे धमाकेदार द्विशतक, युसूफ मुजावरचे नाबाद शतक
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १६ निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेत कॅडेन्स संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवत पश्चिम विभागीय संघाचा एक डाव आणि १४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात २२१ धावांची शानदार खेळी करणारा प्रसाद आंबळे हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
किंग्ज स्पोर्ट्स क्लब हडपसर मैदानावर हा सामना झाला. या सामन्यात पश्चिम विभागीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ४५.२ षटकात सर्वबाद १५५ धावा काढल्या. कॅडेन्स संघाने पहिल्या डावात ६४ षटकात चार बाद ४४७ असा धावांचा डोंगर उभारुन डाव घोषित केला. पश्चिम विभागीय संघाचा दुसरा डाव ३९.२ षटकात १५१ धावांवर सर्वबाद झाला. कॅडेन्स संघाने एक डाव आणि १४१ धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात प्रसाद आंबळे याने २२१ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याने १९१ चेंडूंचा सामना करताना तब्बल ३४ चौकार व दोन षटकार मारले. मोहम्मद युसूफ मुजावर याने १३१ चेंडूत १५० धावांची बहारदार खेळी केली. त्याने १८ चौकार व दोन षटकार ठोकले. पार्थ पवार याने ९३ चेंडूत ७५ धावा फटकावल्या. त्याने १६ चौकार मारले.
गोलंदाजीत प्रसाद आंबळे याने अवघ्या ३५ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. द्विशतक साजरे केल्यानंतर प्रसाद याने पाच गडी बाद करुन अष्टपैलू कामगिरी बजावली. मोहम्मद युसूफ मुजावर याने देखील अष्टपैलू कामगिरी बजावताना १७ धावांत तीन गडी टिपले. प्रणीत जगताप याने २३ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
पश्चिम विभागीय टीम ः ४५.२ षटकात सर्वबाद १५५ (पार्थ पवार ७५, आदित्य मोहिते १५, वीरेन कोलाकी ८, कुणाल चौकेकर ८, गंधर्व अरगडे १२, इतर २६, प्रसाद आंबळे ५-३५, श्रेयस फडतरे २-३३, प्रणीत जगताप २-२३, मोहम्मद युसूफ मुजावर १-२५).
कॅडेन्स टीम ः पहिला डाव ः ६४ षटकात चार बाद ४४७ डाव घोषित (भाव्याराजे भोसले ६२, प्रसाद आंबळे २२१, मोहम्मद युसूफ मुजावर नाबाद १५०, अभिनव शेळके नाबाद १, ज्योतिरादित्य पाटील २-७२, सुहान बांदेकर १-४९).
पश्चिम विभागीय टीम ः दुसरा डाव ः ३९.२ षटकात सर्वबाद १५१ (पार्थ पवार ५९, वीरेन कोलाकी १४, कुणाल चौकेकर ४४, समर्थ जाधव नाबाद १५, मोहम्मद युसूफ मुजावर ३-१७, प्रणीत जगताप २-३५, श्रेयस फडतरे २-३३, प्रसाद आंबळे १-३१, सूर्या निकम १-५).