
अर्जुन साळुंके, तेजस गिलबिलेची चमकदार कामगिरी
पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित एमसीए अंडर १६ निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अॅम्बिशियस संघाने सिंधुदुर्ग संघावर एक डाव आणि २९० धावांनी दणदणीत विजय साकारला. या सामन्यात अर्जुन साळुंके याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.
हांडेवाडी येथील सनी ११ क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. सिंधुदुर्ग संघाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात ३९.३ षटकात सर्वबाद १२१ धावा काढल्या. त्यानंतर अॅम्बिशियस संघाने दमदार फलंदाजी करत ७८ षटकात सात बाद ४३० असा धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला. सिंधुदुर्ग संघाचा दुसरा डाव १२.१ षटकात केवळ १९ धावांत गडगडला. त्यामुळे सिंधुदुर्ग संघाला एक डाव आणि २९० धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यात तेजस गिलबिले याने २१८ चेंडूंचा सामना करत १६३ धावांची बहारदार खेळी केली. त्याने २२ चौकार व तीन षटकार मारले. ओम जाधव याने ७८ चेंडूत ८५ धावा फटकावल्या. त्याने १६ चौकार मारले. आर्यन चौहान याने ४२ चेंडूत ५९ धावांची वेगवान खेळी साकारली. त्याने १० चौकार मारले.
गोलंदाजीत अर्जुन साळुंके याने दुसऱया डावात घातक गोलंदाजी करत केवळ पाच धावा देत सात विकेट घेऊन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पहिल्या डावात अर्जुन साळुंके याने २० धावांत चार विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात अर्जुन याने एकूण ११ विकेट घेतल्या. आर्यन चौहान याने ४६ धावांत चार गडी बाद केले.