सोमवारपासून तीन दिवस रंगणार स्पर्धा
पुणे ः पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना व पुरंदर तालुका बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, साहित्यरत्न शाहीर अण्णाभाऊ साठे, आदी मान्यवरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एमआयटी – एडीटी युनिव्हर्सिटी, लोणी काळभोर, पुणे येथे ५, ६ व ७ मे या कालावधीत पुणे जिल्हा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्याच्या हवेली, पुरंदर, बारामती, खडकी, इंदापूर, भोर, शिरूर, मावळ, दौंड, ई. भागातील बॉक्सिंग खेळाडू कब क्लास,कॅडेट,सब ज्युनिअर, ज्युनिअर, युथ, इलिट या सर्व गटातील मुले व मुली मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत, त्याचप्रमाणे या खेळाडूंना आशिर्वाद देण्यासाठी सर्व राष्ट्रीय व राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित सर्व मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी, एमआयटी लोणीचे क्रीडा संचालक व शिव छत्रपती पुरस्कार विजेते कॅप्टन पद्माकर फड, तसेच पुरंदर तालुका बॉक्सिंग संघटनेचे सचिव विनोद कुंजीर यांच्यासह दोन्ही संघटनांचे सर्व पदाधिकारी या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरिता कार्यरत आहेत.