सीके स्पोर्ट्स संघाचा पीसीए ब संघावर ३६ धावांनी मात

  • By admin
  • May 3, 2025
  • 0
  • 28 Views
Spread the love

प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट ः स्वरित दरकचे सलग दुसरे आक्रमक शतक

छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत सीके स्पोर्ट्स संघाने पीसीए९९ ब संघावर ३६ धावांनी विजय साकारत आपली आगेकूच कायम ठेवली. या सामन्यात पुन्हा आक्रमक शतक ठोकणारा स्वरित दरक याने सामनावीर पुरस्कार मिळवला.

प्रोफेशनल क्रिकेट अकादमी९९चे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी या स्पर्धेचे आयोजन पडेगाव येथील अविनाश साळवी फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर केले आहे. सीके स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकताच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. २४.१ षटके फलंदाजी करत सीके स्पोर्ट्स संघाने सर्वबाद १९७ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना पीसीए९९ ब संघ २५ षटकात १६१ धावा काढून सर्वबाद झाला. सीके संघ ३६ धावांनी विजयी झाला.

या सामन्यात स्वरित दरक याने पुन्हा एकदा शानदार शतक साजरे केले. स्वरित याने ५६ चेंडूत १०४ धावांची वादळी खेळी केली. एकाच दिवसात दुसरे शतक साजरे करताना स्वरित याने १५ चौकार व पाच षटकार मारले. प्रतीक कदम याने ४२ चेंडूत ४५ धावांचे योगदान दिले. त्याने सात चौकार मारले. कृतार्थ पाडळकर याने तीन चौकारांसह २५ धावांचे योगदान दिले.

गोलंदाजीत ज्योतिरादित्य राजगुरू याने ३३ धावांत पाच विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. स्वरित दरक याने ३० धावांत चार गडी बाद करत अष्टपैलू कामगिरी बजावली. कार्तिक भारद्वाज याने ३६ धावांत तीन बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक ः सीके स्पोर्ट्स ः २४.१ षटकात सर्वबाद १९७ (स्वरित दरक १०४, कृतार्थ पाडळकर २५, सिद्धी भोयर १२, यश मगरे ११, इतर ३७, ज्योतिरादित्य राजगुरू ५-३३, कार्तिक भारद्वाज ३-३६, सोहम हारके १-२५) विजयी विरुद्ध पीसीए९९ ब टीम ः २५ षटकात सर्वबाद १६१ (विकी भोसले १२, प्रतीक कदम ४५, कार्तिक भारद्वाज १७, कार्तिक अटोळे १२, प्रज्ज्वल तिळकरी १९, गार्गी तलवंडे १०, इतर ३५, स्वरित दरक ४-३०, श्रीरंग कुलकर्णी २-३५, अभिषेक कुचेकर २-२५, आनंद भोपळे १-३७). सामनावीर ः स्वरित दरक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *