खेलो इंडिया स्‍पर्धेत महाराष्ट्राचे ४३७ खेळाडूंचे पथक

  • By admin
  • May 3, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

खेळाडू विमानाने बिहारमध्ये दाखल, महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमणार ः सुधीर मोरे

पुणे : खेलो इंडिया युथ गेम्सच्या सातव्‍या पर्वाला रविवार ४ मे पासून बिहारमध्ये सुरूवात होत आहे. या स्‍पर्धेसाठी विमान प्रवासने महाराष्ट्र संघाचे पहिले पथक बिहारकडे रवाना झाले आहे. या पथकाला शुभेच्‍छा देताना शासनाच्‍या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी बिहारमध्येही महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमणार असा विश्वास व्‍यक्‍त केला.

प्रथमच खेलो इंडिया स्‍पर्धेत बिहारमध्ये रंगणार आहे. या स्‍पर्धेसाठी महाराष्ट्राचे एकूण ४३७ खेळाडूंसह १२८ प्रशिक्षक, व्‍यवस्‍थापक असे एकूण ५६५ जणांचे पथक सहभागी होणार आहे, यापैकी पहिल्‍या टप्‍प्‍यातील स्‍पर्धेसाठी आर्चरी, कबड्डी, गटका, ज्‍युदो, मल्‍लखांब, जलतरण, खो-खो, सेपकटकरा खेळाचे पथक शनिवारी पहाटे पटनाला रवाना झाले. या खेळाडूंना क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक सुधीर मोरे यांनी पुष्पगुच्‍छ देऊन शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी पथकप्रमुख महादेव कसगावडे, सहाय्यक संचालक चंद्रशेखर साखरे, क्रीडा अधिकारी विकास माने, अरूण पाटील, तालुका क्रीडा अधिकारी गीता साखरे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

विमान प्रवासाने स्‍पर्धेत आपल्‍या खेळाडूंना पाठविण्याची परंपरा खेलो इंडिया स्‍पर्धेतही शासनाने कायम राखली आहे. विमान प्रवासाची सोय करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्‍य आहे. बिहारमध्ये जाण्यासाठी विमान प्रवास महागडा असतानाही अधिकचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. पुण्यातील बालेवाडी येथे सराव शिबिरात कसून सराव करून पहिल्‍या टप्‍प्‍यातील स्‍पर्धेसाठी १९० खेळाडू पटनाकडे रवाना झाले. या खेळाडूंना शुभेच्‍छा देताना सहसंचालक सुधीर मोरे म्‍हणाले की, सहा पैकी चार स्‍पर्धेत आपण विजेतेपद जिंकले आहे. हीच पंरपरा कायम राखण्यासाठी आपण मैदानात पदकासाठी झुंजायचे आहे. मध्य प्रदेश, तामिळनाडू प्रमाणेच बिहारमध्येही महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमणार ही मला खात्री आहे.

महाराष्ट्राचा संघ यंदाच्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये केवळ जेतेपद राखण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरणार नाही, तर गत वेळेपेक्षा अधिक पदकांची कमाई करण्याचा आमचा निर्धार आहे. मनासारखा सराव झालेला असल्याने महाराष्ट्राचे खेळाडू मोठ्या आत्मविश्वासाने या स्पर्धेत खेळतील. याचा नक्कीच आम्हाला फायदा होणार होईल असे पथकप्रमुख महादेव कसगावडे यांनी सांगितले.

पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात हॉकी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिस, रग्बी, सायकलिंग खेळांची शिबीर सुरू आहेत. शेवटच्‍या टप्‍प्‍यात ॲथलेटिक्‍सचा संघ रवाना होणार आहे. बिहारमध्ये २३ तर दिल्‍लीत ३ क्रीडा प्रकार रंगणार आहे, दिल्‍लीत नेमबाजी, जिम्‍नॅस्‍टिक्‍स व सायकलिंग स्‍पर्धा होतील. नेमबाजीसाठी महाराष्ट्राचा १३ खेळाडूंचा संघ ५ मे रोजी रवाना होईल.

गत तामिळनाडू स्‍पर्धेत ५७ सुवर्ण, ४८ रौप्य व ५३ कांस्य अशी एकूण १५८ पदके मिळवून गतविजेत्या महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. गेल्या ६ पर्वात महाराष्ट्राने ४ वेळा सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *