
१६ गुणांसह अव्वल स्थानावर, रोमारियो शेफर्डचे विक्रमी नाबाद अर्धशतक निर्णायक
बंगळुरू : आयुष म्हात्रे (९४), रवींद्र जडेजा (नाबाद ७७) यांच्या शानदार कामगिरीवर वेगवान गोलंदाज यश दयाल याचे शेवटचे अचूक षटक निर्णायक ठरले. आरसीबी संघाने चेन्नई सुपर किंग्ज संघावर दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. या विजयाने आरसीबी संघाने १६ गुणांसह गुण तालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. रोमरियो शेफर्डची वादळी नाबाद अर्धशतकी फलंदाजी निर्णायक ठरली.
चेन्नई सुपर किंग्ज संघासमोर विजयासाठी २१४ धावांचे लक्ष्य होते. आयुष म्हात्रे व शेख रशीद ही सलामी जोडी मैदानात उतरली आणि ४.३ षटकात ५१ धावांची जलद भागीदारी करत संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. रशीद याने ११ चेंडूत १४ धावा काढल्या. त्याने एक षटकार व एक चौकार मारला. सॅम करन केवळ ५ धावा काढून तंबूत परतला. चेन्नई संघासाठी हा मोठा धक्का होता.

दोन बाद ५८ अशा बिकट स्थितीतून संघाला सावरताना युवा फलंदाज आयुष म्हात्रे याने वादळी फलंदाजी केली. त्याने ४८ चेंडूंचा सामना करत ९४ धावा फटकावल्या. षटकार मारुन शतक साजरे करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. आयुष याने नऊ चौकार व पाच टोलेजंग षटकार मारुन आपला ठसा उमटवला. दुर्दैवाने त्याचे शतक सहा धावांनी हुकले. त्याने जडेजा समवेत तिसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली व संघाच्या विजयाची आशा कायम ठेवली.
रवींद्र जडेजाने आक्रमक अर्धशतक साजरे केले. जडेजाने ४५ चेंडूत नाबाद ७७ धावांचे योगदान दिले. धोनीने एक षटकार ठोकत १२ धावा फटकावल्या. २०व्या षटकात यश दयाल याने धोनीला बाद केले आणि सामन्याचे पारडे बदलले. शिवम दुबे याने षटकार ठोकत सामन्यातील रोमांच कायम ठेवला. परंतु, त्यानंतर दयाल याने तीन चेंडू अचूक टाकत संघाला दोन धावांनी रोमहर्षक विजय मिळवून दिला. चेन्नई संघ २० षटकात पाच बाद २११ धावा काढू शकला. लुंगी एन्गिडी याने ३० धावांत तीन विकेट घेतल्या.
रोमारियो शेफर्डची वादळी फलंदाजी
जेकब बेथेल आणि विराट कोहली यांच्या शानदार फलंदाजी नंतर रोमारियो शेफर्डच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने चेन्नई सुपर किंग्जसमोर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर आरसीबीने २० षटकांत पाच गडी गमावून २१३ धावा केल्या. त्यांच्यासाठी, रोमारियो शेफर्डने शेवटच्या दोन षटकांमध्ये कहर केला. शेफर्ड फक्त १४ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक करणारा संयुक्त तिसरा फलंदाज ठरला. या बाबतीत त्याने पॅट कमिन्स आणि केएल राहुलची बरोबरी केली. त्याच वेळी, सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाज यशस्वी जयस्वाल आहे, ज्याने १३ चेंडूत हा पराक्रम केला.
आरसीबीच्या रोमारियो शेफर्ड याने या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक झळकावले आहे. आरसीबीच्या या खेळाडूने फक्त १४ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. आयपीएलच्या या हंगामात सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सूर्यवंशीच्या नावावर होता. वैभवने गुजरात टायटन्सविरुद्ध १७ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
बेथेल व कोहली या जोडीने ९७ धावांची सलामी दिली. बेथेल याने ३३ चेंडूत ५५ धावा फटकावल्या. त्याने आठ चौकार व दोन षटकार मारले. कोहली याने ३३ चेंडूत ६२ धावांची बहारदार खेळी केली. कोहलीने पाच उत्तुंग षटकार व पाच चौकार मारले. जेकब बेथेल आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी डळमळीत झाली. पण नंतर डावाच्या शेवटच्या दोन षटकांमध्ये रोमारियो शेफर्डने आरसीबीला पुन्हा सामन्यात आणले.
खलील अहमदविरुद्ध धावा लुटल्या
चेन्नईकडून खलील अहमदने १९ वे षटक टाकले. या षटकात रोमारियोने ४ षटकार आणि २ चौकार मारले. खलीलच्या या षटकात एकूण ३३ धावा झाल्या. या धावांसह हे आयपीएलच्या या हंगामातील सर्वात महागडे षटक ठरले. या षटकात खलीलने एक नो बॉल देखील टाकला.
२० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्धशतक
चेन्नई सुपर किंग्जकडून मथिशा पाथिरानाने २० वे षटक टाकले. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टिम डेव्हिडने धाव घेतली आणि रोमारियोला स्ट्राईक दिला. पाथिरानाच्या षटकातही २१ धावा मिळाल्या, ज्यात २ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रोमारियो शेफर्डने आपले अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात शेफर्डने १४ चेंडूत ५३ धावांची नाबाद खेळी केली, ज्यामध्ये त्याने ६ षटकार आणि ४ चौकार मारले. या सामन्यात रोमारियो शेफर्डचा स्ट्राईक रेट ३७८.५७ होता. पाथिराणा याने २६ धावांत तीन विकेट घेतल्या.