
नागपूर ः नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे कार्याध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक एस जे अँथोनी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
रोहिणी आणि मोनिका राऊत या दोन आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षण दिले होते. याशिवाय वैशाली फटिंग, रश्मी कटिंग, विजया सोनवणे, वसुधा मोरे, माधुरी आणि रश्मी गुरनुले यासारख्या राष्ट्रीय पदक विजेत्या आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. वैशाली फटिंग आणि विजया सोनवणे या त्यांच्या दोन शिष्यांना शिवछत्रपती पुरस्कार देऊन राज्य शासनाने सन्मानित केले आहे.
रेशीमबाग मैदान म्हणजे अँथोनी सर असं एक समीकरण झालं होतं. ८ नोव्हेंबर १९५० रोजीचा जन्म असलेले सिद्धार्थसेन ॲथोनी हे “तंबी” नावाने लोकप्रिय होते. हँडबॉल आणि ॲथलेटिक्स हे दोन त्यांचे आवडते खेळ होते. पुढे मात्र त्यांनी ॲथलेटिक्स खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी स्वतःला वाहून घेतले. एमएसईबी येथे इंजिनीयर म्हणून आपल्या सेवाकाळात एक उत्कृष्ट थाळीफेक आणि गोळाफेकपटू म्हणून त्यांची ख्याती होती. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ रेशीमबाग मैदानावर तळागाळातील खेळाडूंना शोधून त्यांचे पैलू पाडण्यासाठी आपले उर्वरित आयुष्य खर्च केले. दहा-बारा वर्षांपूर्वी रेशीमबाग मैदानावर त्यांच्या चाहत्यांनी ते सेवानिवृत्त होताच मोठा सत्कार समारंभ आयोजित केला होता.
नागपूर जिल्ह्यात संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून ते पालकांच्या भूमिकेत सदैव राहायचे. नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष गुरुदेव नगराळे, सभापती उमेश नायडू आणि एस जे अँथोनी सर असं त्रिकूट ॲथलेटिक्सचे भरभराटीसाठी गेले वीस वर्षापासून झटत होतं. गरीब मुलांना मुला-मुलींना ॲथलेटिक्स खेळाकडे वळवून पुढे त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करणे, वेळप्रसंगी त्यांच्या आहारासाठी आणि प्रवासाकरिता पैशाची मदत करत राहणे, असा सरांचा स्वभाव होता. कुठलाही मोठेपणा मनात न आणता ते रेशीमबाग मैदानावरील दगड आणि खिळे खेळाडू मैदानावर येण्यापूर्वी उचलून ठेवत असत, जेणेकरून खेळाडूंना धावतांना त्याचा त्रास होऊ नये, असे त्यांना वाटत असेल.अशी आठवण या भागाचे माजी नगरसेवक आणि जिल्ह्या संघटनेचे उपाध्यक्ष नागेश सहारे यांनी सांगितले. सरांच्या निधनाने विदर्भातील ॲथलेटिक्सची खूप मोठी हानी झाली आहे, ती भरून काढणे अशक्यप्राय आहे,अशी भावना जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव आणि पूर्व आंतरराष्ट्रीय खेळाडू डॉ शरद सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.