
मुंबई : माटुंगा येथील न्युहिंद स्पोर्टिंग क्लबतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ३३व्या कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला १० मेपासून दमदार सुरुवात होणार आहे. युवा क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा नसून, मुंबईच्या प्रतिनिधित्वाकडे झेपावण्याचं स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी आहे.
एमसीएच्या उन्हाळी प्रशिक्षण वर्गातील १६ वर्षांखालील मुलांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा निवड चाचणीचा दर्जा लाभलेली असून, येथे चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मुंबई संघात स्थान मिळवण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेत एकूण १६ संघ, चार गटांमध्ये विभागले असून, २७ सामने खेळवले जाणार आहेत. सामने दोन दिवसांचे असतील. स्पर्धा प्रारंभी साखळी पद्धतीने आणि नंतर बाद फेरी पद्धतीने रंगणार आहे. माटुंगा, कांदिवली, विरार, डहाणू, सांताक्रूझ, चेंबूर आणि नवी मुंबई येथील मैदानांवर सामने पार पडतील.
३०० हून अधिक खेळाडू आणि ५४ पंच या स्पर्धेत सहभागी होणार असून, या सर्वांना विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचा उल्लेख विशेष आहे. यंदा ठाणे केंद्रातील दोन संघांनाही स्पर्धेत प्रवेश देण्यात आला आहे.
स्पर्धेतील हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजांना गोविंद कोळी यांच्या स्मरणार्थ विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दरवर्षीप्रमाणे यंदाही एका ज्येष्ठ क्रीडापटूला ‘जीवनगौरव’ आणि ज्येष्ठ पत्रकार वि वि करमरकर स्मृती गौरव पुरस्कार दिला जाणार आहे.
१० मे रोजी सकाळी ८.३० वाजता उद्घाटन समारंभ माटुंगा येथे होणार असून, एमसीएचे सचिव अभय हडप आणि संयुक्त सचिव दीपक पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. ३१ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता बक्षीस समारंभ होणार असून, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
मुंबईच्या क्रिकेट विश्वातील या महत्त्वाच्या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली चमक दाखवण्याची ही मोठी संधी आहे!