
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली कारण त्याने बंदी घातलेली औषधे घेतली होती, ज्यासाठी तो चाचणीत पॉझिटिव्ह आढळला. शनिवारी स्वतः या स्टार खेळाडूने ही माहिती दिली. रबाडा काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आणि तेव्हापासून तो गुजरात टायटन्समध्ये सामील होऊ शकला नाही. या वेगवान गोलंदाजाने चालू हंगामात गुजरातसाठी पहिले दोन सामने खेळले. पंजाब किंग्जविरुद्ध त्याने ४१ धावा देऊन फक्त एक विकेट घेतली. यानंतर, मुंबईविरुद्ध, त्याने ४२ धावा खर्च केल्या आणि फक्त एकच विकेट घेतली.
या विषयावर रबाडा म्हणाला की, मी वैयक्तिक कारणांमुळे आयपीएलमध्ये सहभागी होऊन अलीकडेच दक्षिण आफ्रिकेला परतलो आहे. हे माझ्या बंदी घातलेल्या औषधांच्या वापरामुळे घडले आहे. ज्यांना मी निराश केले आहे त्या सर्वांची मी माफी मागतो. क्रिकेट खेळण्याच्या विशेषाधिकाराला मी कधीही गृहीत धरणार नाही. हा विशेषाधिकार माझ्यापेक्षा मोठा आहे. हे माझ्या वैयक्तिक आकांक्षांपेक्षा खूप जास्त आहे. मी तात्पुरत्या निलंबनाची शिक्षा भोगत आहे आणि मला आवडणाऱ्या खेळात परत येण्यास मी उत्सुक आहे. अलीकडच्या काळात क्रिकेटमध्ये अशा प्रकाराच्या बंदीला एखाद्या खेळाडूला सामोरे जावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. या निलंबन निर्णयामुळे रबाडा हा पुढील महिन्यात लॉर्ड्स येथे होणाऱया दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळू शकेल की नाही हे स्पष्ट नाही. या निर्णयामुळे रबाडा खूप दुःखी आहे आणि तो खेळात परत येण्यास उत्सुक आहे. रबाडाने आतापर्यंत फक्त ७० कसोटी सामने खेळले असून त्यात २२च्या सरासरीने ३२७ बळी घेतले आहेत. त्याने १०८ एकदिवसीय सामन्यात १६८ बळी घेतले आहेत आणि ६५ टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात ७१ बळी घेतले आहेत.
शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्धच्या विजयासह गुजरात टायटन्स संऑघाने पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. गुजरातचे १० सामन्यांत सात विजय आणि तीन पराभवांसह १४ गुण आहेत. दुसरीकडे, ‘करो या मर’ अशा सामन्यात आलेल्या हैदराबादच्या आशांना धक्का बसला आहे आणि त्यांचा आयपीएल २०२५ चा प्रवास जवळजवळ संपला आहे. हैदराबादचे १० सामन्यांत तीन विजय आणि सात पराभवांसह सहा गुण आहेत आणि ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. आता ६ मे रोजी गुजरातचा सामना मुंबईशी होईल. या सामन्यातील विजयासह गुजरात संघ प्ले ऑफमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करेल.