पंजाब किंग्जला लखनौवर ३७ धावांनी विजय 

  • By admin
  • May 4, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

प्रभसिमरनची धमाकेदार फलंदाजी, अर्शदीप सिंगची घातक गोलंदाजी  ़़

धर्मशाळा : धमाकेदार फलंदाज प्रभसिमरन सिंग (९१) आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (३-१६) यांच्या जोरदार कामगिरीच्या बळावर पंजाब किंग्ज संघाने लखनौ सुपर जायंट्स संघाचा ३७ धावांनी पराभव केला. या विजयासह पंजाबने १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

लखनौ सुपर जायंट्स संघासमोर विजयासाठी २३८ असे मोठे आव्हान होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना लखनौ संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली. एडेन मार्करम (१३), मिचेल मार्श (०), निकोलस पूरन (६) हे धमाकेदार फलंदाज झटपट बाद झाले. २७ धावसंख्येत लखनौने तीन विकेट गमावल्या. 

कर्णधार ऋषभ पंत याने १७ चेंडूत १८ धावांचे योगदान देऊन बाद झाला. त्याने दोन चौकार व एक षटकार मारला. पंत याने पुन्हा एकदा निराश केले. डेव्हिड मिलर (११) देखील लवकर बाद झाला. लखनौने पाच विकेट अवघ्या ७३ धावांत गमावले. त्यानंतर आयुष बदोनी व अब्दुल समद या जोडीने ८१ धावांची भागीदारी केली. समद चार षटकार व दोन चौकारांसह ४५ धावांचे योगदान देऊन बाद झाला. बदोनी याने सर्वाधिक ७४ धावा काढल्या. त्याने पाच चौकार व पाच षटकार मारले. आवेश खानने नाबाद १९ धावा काढल्या. लखनौने २० षटकात सात बाद १९९ धावा काढल्या. अर्शदीप सिंग (३-१६), उमरझाई (२-३३) यांनी लखनौची दाणादाण उडवली. 

पंजाबची वादळी फलंदाजी 

प्रभसिमरन सिंगच्या ४८ चेंडूत ९१ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर पंजाब किंग्ज संघाने लखनौ सुपर जायंट्ससमोर २३७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर पंजाबने २० षटकांत पाच गडी गमावून २३६ धावा केल्या. आयपीएलमधील हा त्याचा चौथा सर्वोच्च स्कोअर आहे. त्याच वेळी, धर्मशाला येथे पंजाब संघाने २०११ नंतर पहिल्यांदाच २०० धावांचा टप्पा गाठला आहे. यापूर्वी, पंजाबने आरसीबीविरुद्ध दोन गडी गमावून २३२ धावा केल्या होत्या.

या सामन्यात पंजाबची सुरुवात धक्कादायक झाली. पहिल्याच षटकात आकाश सिंगने प्रियांश आर्यला आपला बळी बनवले. तो फक्त एक धाव करू शकला. यानंतर प्रभसिमरन सिंग आणि जोश इंगलिस यांनी पदभार स्वीकारला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी ४८ धावांची भागीदारी केली. आकाश सिंगने यष्टीरक्षक फलंदाज इंगलिश याला तंबूचा रस्ता दाखवला. एका चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने तो ३० धावा काढून बाद झाला.

५० धावांवर दोन विकेट गमावलेल्या पंजाबची जबाबदारी श्रेयस अय्यर आणि प्रभसिमरन सिंग यांनी घेतली. दोघांनीही आक्रमक फलंदाजी केली आणि तिसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. दिग्वेश राठीने कर्णधार अय्यरला बाद केले. त्याचा झेल मयंक यादवने पकडला. तो २५ चेंडूत ४५ धावा करून परतला. त्याच वेळी, प्रभसिमरन सिंगचे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे शतक नऊ धावांनी हुकले. लखनौविरुद्ध त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि सात षटकार लागले. पंजाबकडून नेहल वधेराने १६ धावा केल्या तर शशांक आणि स्टोइनिस अनुक्रमे ३३ आणि १५ धावांवर नाबाद राहिले. लखनौकडून आकाश सिंग आणि दिग्वेश राठी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर प्रिन्स यादवला एक यश मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *