
धर्मशाळा ः आयपीएल स्पर्धेत सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याचा पराक्रम रियान पराग याने केला. आयपीएल स्पर्धेत अशी कामगिरी करणारा रियान पराग हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रियानची तुफानी खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. गतविजेत्या केकेआर संघाने अवघ्या एका धावेने सामना जिंकला. या पराभवाला रियान पराग याने स्वतःला जबाबदार धरले आहे.
कर्णधार रियान परागच्या शानदार खेळीनंतरही राजस्थान रॉयल्सला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. या सामन्यात रियान परागने ९५ धावांची खेळी खेळली ज्यामुळे संघ विजयाच्या जवळ पोहोचला, परंतु पराभवानंतर रियानने स्वतःच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि पराभवासाठी त्याला जबाबदार धरले. केकेआर आणि राजस्थान यांच्यातील हा सामना खूपच चुरशीचा होता आणि शेवटी, केकेआर संघाने एक महत्त्वाचा विजय मिळवला.
एक रोमांचक सामना
केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आंद्रे रसेलच्या झंझावाती खेळीच्या जोरावर २० षटकांत ४ गडी गमावून २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, राजस्थानला २० षटकांत आठ गडी गमावून फक्त २०५ धावा करता आल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही कारण संघाने ७१ धावांवर पाच विकेट गमावल्या. त्यानंतर, रियान परागने शिमरॉन हेटमायरसोबत सहाव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली आणि संघाला अडचणीतून वाचवले. यादरम्यान, रायनने मोईन अलीच्या षटकात सलग पाच षटकार मारले. २९ धावा काढून बाद झालेल्या हेटमायरला बाद करून हर्षित राणाने ही भागीदारी मोडली. यानंतर काही वेळातच हर्षितने रायनलाही आपला बळी बनवले. रायनला त्याचे शतक पूर्ण करता आले नाही आणि तो ९५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
पराभवाने रियान निराश
सामन्यानंतर, रियान पराग या पराभवामुळे निराश दिसत होता. रियान पराग म्हणाला की, माझी विकेट गमावल्याबद्दल मला फक्त दुःख झाले. मी शेवटच्या दोन षटकांपर्यंत थांबण्याचा विचार करत होतो, पण दुर्दैवाने मी १८ व्या षटकात बाद झालो. १६व्या आणि १७व्या षटकात आम्हाला जास्त धावा करता आल्या नाहीत, ही माझी चूक होती. मी हा सामना पूर्ण करायला हवा होता. मी बाद होईपर्यंत चांगली फलंदाजी केली. पराभूत कर्णधार म्हणून मुलाखत देणे चांगले वाटत नाही आणि मी तेच विचार करत होतो.
राजस्थानचे आव्हान संपुष्टात
राजस्थानकडे या सामन्यात गमावण्यासारखे काहीही नव्हते कारण त्यांचा संघ आधीच प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडला आहे. शेवटच्या चार संघांच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला राजस्थान संघ पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर आहे. राजस्थानने १२ पैकी तीन सामने जिंकले आहेत आणि नऊ सामने गमावले आहेत. या विजयासह, केकेआरच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत राहिल्या आहेत. केकेआरचे ११ सामन्यांत पाच विजय, पाच पराभव आणि एक बरोबरीसह ११ गुण आहेत आणि ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत.