
अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजन
अहिल्यानगर ः अहिल्यानगरच्या सप्तक सदन, जुना कापड बाजार येथे शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित अखिल भारतीय मोतीलालजी फिरोदिया खुली बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.
येत्या ७ ते ११ मे या कालावधीत होणाऱया या स्पर्धेत भारतातून बुद्धिबळ खेळाडू खेळण्यासाठी येणार असून आत्तापर्यंत गुजरात, आंध्र प्रदेश, दीव, दमन, गोवा, तामिळनाडू, महाराष्ट्र इत्यादी राज्यातून ३५० पेक्षा अधिक खेळाडूंनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. फिडे मास्टर वेदांत पानसरे (मुंबई), इंटरनॅशनल मास्टर राहुल सगमा (गोवा), इंटरनॅशनल मास्टर विक्रमादित्य कुलकर्णी (महाराष्ट्र) यांच्यासह अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत असे अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. साडेपाच वर्षाचा बाल खेळाडू तसेच ८३ वर्षाचे वयस्कर खेळाडू सुद्धा यात आपले बुद्धीचे बळ पणाला लावणार आहे असे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले.
बुधवार ७ मे रोजी सकाळी ११.३० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून त्यानंतर स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत एकूण ९ फेऱ्या होणार आहेत शेवटी रविवार (११ मे) दुपारी ३ वाजता अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.
या स्पर्धेत विविध गटात प्रोत्साहन पर रोख बक्षिसे, आकर्षक ५० करंडक व सर्व खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे प्रमुख पंच प्रवीण ठाकरे (जळगाव) हे असून त्यांना शार्दुल टापसे (सातारा), पवन राठी हे सहाय्यक पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. या दोघांना ६ सहाय्यक पंच मदत करणार आहेत. ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियम नियमावली नुसार होणार आहे.
तसेच या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे १०० लाकडी पट व सोंगट्यांचा वापर महाराष्ट्रात पहिल्यांदा होणार आहे. अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सदस्य सुबोध ठोंबरे, पारूनाथ ढोकळे, शाम कांबळे, प्रशांत गंगेकर, देवेंद्र ढोकळे, मनीष जस्वानी, प्रकाश गुजराती, चेतन कड, संजय खडके, नवनीत कोठारी, डॉ स्मिता वाघ, शुभदा ठोंबरे, रोहिणी अडकर आदी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अहिल्यानगर शहरातील खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वरील स्पर्धेत अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी यशवंत बापट (९३२६०९२५०१) व पारूनाथ ढोकळे (९८५०७०४२६८) यांच्याशी संपर्क साधावा.