
प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट ः वरद सुलतान, आरोही आहेर, रुद्राक्ष कार्लेची प्रभावी कामगिरी

छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत प्रदीप स्पोर्ट्स संघाने पीसीए९९ क संघाचा ९७ धावांनी पराभव केला. या सामन्यात वरद सुलतान याने ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करुन सामनावीर पुरस्कार संपादन केला.

पडेगाव येथील अविनाश साळवी फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. अंडर १४ क्रिकेटपटूंना व्यापक खेळण्याची संधी मिळावी या हेतूने प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रोफेशनल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी सांगितले. या सामन्यात प्रदीप स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात चार बाद २४३ असा धावांचा डोंगर उभारुन सामन्यावर वर्चस्व गाजवले. या धावसंख्येचा पाठलाग करताना पीसीए९९ क संघ २३.४ षटकात १४६ धावांत सर्वबाद झाला. प्रदीप स्पोर्ट्स संघाने ९७ धावांनी सामना जिंकला.

या सामन्यात वरद सुलतान याने अवघ्या ४५ चेंडूत ७६ धावा फटकावल्या. वरदने १४ चौकार खणखणीत चौकार मारले. रुद्राक्ष कार्ले याने केवळ २७ चेंडूंत ७२ धावांची तुफानी खेळी साकारली. त्याने सहा टोलेजंग षटकार व सहा चौकार मारले. आरोही आहेर हिने ६८ चेंडूत ६५ धावांची दमदार खेळी साकारली. तिने अर्धशतकी खेळीत १० चौकार मारले. गोलंदाजीत मयूर सोमासे याने २० धावांत तीन विकेट घेतल्या. आर्यन शिंदे याने ७ धावांत दोन गडी बाद केले. सत्यजीत याने १९ धावांत दोन बळी टिपले.

संक्षिप्त धावफलक
प्रदीप स्पोर्ट्स ः २५ षटकात चार बाद २४३ (वरद सुलतान ७६, आरोही आहेर ६५, रुद्राक्ष कार्ले नाबाद ७२, इतर २४, शौर्य राजपूत १-५६, अंगराज सिंग १-४१, आरुष राजगुरू १-३०) विजयी विरुद्ध पीसीए९९ क संघ ः २३.४ षटकात सर्वबाद १४६ (आरुष राजगुरू ३४, आतिश शिंदे १०, आर्यन राठोड ३३, कृष्णा २३, विनित पैठणपगारे ६, इतर ३४, मयूर सोमासे ३-२०, आर्यन शिंदे २-७, सत्यजीत २-१९, श्रेणिक काळे १-२४). सामनावीर ः वरद सुलतान.