
कृष्णा नेरकरची प्रभावी गोलंदाजी
धुळे ः नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित १६ वर्षांखालील मुलांच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत धुळे जिल्हा क्रिकेट संघाने शानदार कामगिरी करत साखळी स्पर्धेत सलग दुसरा विजय प्राप्त केला आहे.
स्पर्धेत धुळे जिल्हा क्रिकेट संघाचा दुसरा सामना हा नांदेड जिल्हा क्रिकेट असोसिएशन नांदेड संघासोबत होता. नाशिक येथील मेरी क्रिकेट मैदानावर हा सामना झाला. नांदेड जिल्हा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धुळे जिल्हा संघाच्या भेदक गोलंदाजांनी नांदेड जिल्हा संघाला ३१.४ षटकात १०९ धावांवर सर्वबाद केले. धुळे जिल्हा संघाकडून फिरकी गोलंदाज कृष्णा नेरकर याने ८ षटकात १८ धावा देऊन ४ गडी बाद केले. ऋग्वेद शिरसाठ व सोहम चौधरी यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले तर आदित्य पवार व देवेन वाघ यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.

प्रत्युत्तरात पहिल्या डावात धुळे जिल्हा संघ ३४.३ षटकात केवळ सर्वबाद १०२ करू शकला. पहिल्या डावात सात धावांची पिछाडी असूनही दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या नांदेड संघाला धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंनी आक्रमक क्षेत्ररक्षण व भेदक गोलंदाजीच्या बळावर १७ षटकात अवघ्या ४२ धावसंख्येवर गारद केले. या शानदार कामगिरीचा शिल्पकार संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज कृष्णा नेरकर हा ठरला. नेरकर याने आठ षटकात १६ धावा देऊन ५ गडी बाद केले. प्रणव अग्रवाल याने १.५ षटकात १ धाव देऊन ३ गडी बाद केले तर कर्णधार देवेन वाघ याने ५ षटकात १० धावा देऊन २ गडी बाद केले.
विजयासाठी आवश्यक ५० धावांचे लक्ष धुळे जिल्हा संघाने नऊ गडी राखून पूर्ण केले. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार सामन्यात ९ गडी बाद करणाऱ्या कृष्णा किशोर नेरकर याला देण्यात आला. या विजयाच्या बळावर गुणतालिकेत १३ गुणांसह धुळे जिल्हा संघ हा प्रथम क्रमांकावर आहे. या संघास मुख्य प्रशिक्षक राजन चौक, राकेश बोरसे व संदीप देशमुख यांचे मार्गदर्शन लाभत आहे.