जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राची पदक सप्तमी, आदितीला सुवर्ण

  • By admin
  • May 5, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

गया : जलतरणात सलग दुसर्‍यांदा आदिती हेगडेने सुवर्णपदकाची लुट करीत सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रासाठी पदकाचे खाते उघडले. आदितीच्या १ सुवर्णासह १ रौप्य व ४ कांस्य पदकांची कमाई करीत महाराष्टाने सोमवारी पदकाची सप्तमी साजरी केली.

गया शहरातील बीआयपीएआरडीच्या जलतरण तलावावर अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी पदकांची लयलूट केली. आदिती हेगडेने १ सुवर्ण, १ कांस्य, समाईरा मल्होत्राने १ रौप्य, तर शुभम जोशी, झारा बक्षी, वेदांत तांदळे, ऋजुता राजाज्ञा यांनी कांस्य पदके जिंकून दिवस गाजवला.

आदितीची शतांश सेंकदाने बाजी
मुलींच्या २०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात मुंबईच्या आदिती हेगडे २ मिनिटे ९.५१ सेंकद वेळेत शर्यत पूर्ण करून महाराष्ट्रासाठी स्पर्धेतील पहिले पदक जिकले. चुरशीच्या शर्यतीत शतांश सेकंदाच्या फरकाने दिल्लीच्या तितिक्षा रावतला मागे टाकून आदितीने बाजी मारली. तितिक्षाला २ मिनिटे ९.५८ सेंकद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याचबरोबर ८०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात आदितीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आदितीचे खेलो इंडिया स्पर्धेतील हे ६ वे पदक ठरले. गत तामिळनाडू स्पर्धेत तिने पदकाचा चौकार झळकावला होता. मुंबईतील खेलो इंडिया अकादमीत ती सराव करत असते.

मुलींच्या १०० मीटर बेस्ट स्ट्रोक प्रकरात महाराष्ट्राचा डबल धमाका बघायला मिळाला. मुंबईच्या समाईरा मल्होत्रा व झारा बक्षी यांनी अनुक्रम रूपेरी व कांस्य पदकाला गवसणी घातली. कर्नाटकच्या मानवी वर्मा हिने सुवर्णपदक जिंकले. मुलांच्या १०० मीटर बेस्ट स्ट्रोक प्रकरात ठाणेच्या शुभम जोशीने कांस्यपदकाची कमाई केली. कर्नाटकच्या क्रीश सुकुमारने सुवर्ण पदकाचा पल्ला पार केला.


मुलांच्या ५० मीटर बटरफ्लाय प्रकारात पुण्याच्या जलतरणपटूंनी महाराष्ट्रासाठी पदकांचा करिश्मा घडविला. मुलांच्या गटात पर्दापणातच वेदांत तांदळेने कांस्यपदकावर नाव कोरले. मुलींच्या गटात रूतुजा राजाज्ञाने सलग दुसर्‍या स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला. गत स्पर्धेत तिने २ सुवर्णपदके जिंकली होती. वेदांत व ऋजुता हे दोघे पुण्यातील डेक्कन जिमखाना तलावावर सराव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *