मुसळधार पावसामुळे हैदराबादचे आव्हान संपुष्टात

  • By admin
  • May 5, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

दिल्ली कॅपिटल्स संघाला १३३ धावांवर रोखले, पॅट कमिन्सची घातक गोलंदाजी 

हैदराबाद : मुसळधार पावसामुळे सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना रद्द करण्यात आला. या सामन्यात हैदराबाद संघाच्या गोलंदाजांनी घातक गोलंदाजी  करुन दिल्लीला अवघ्या १३३ धावांवर रोखले होते. मात्र, पावसामुळे एकच डाव पूर्ण होऊ शकला. 

सनरायझर्स हैदराबाद संघासमोर विजयासाठी १३४ धावांचे लक्ष्य होते. मात्र, डाव सुरू होण्यापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास दीड-दोन तास पाऊस कोसळत होता. मैदान ओलसर असल्याने पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबरोबरच हैदराबाद संघाचे प्लेऑफ गाठण्याची शक्यता संपुष्टात आली. दिल्लीने एक गुण घेऊन १३ गुणांसह या शर्यतीत आपले स्थान कायम ठेवले. 

हैदराबादची घातक गोलंदाजी 
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. कर्णधार पॅट कमिन्सने ४ षटकांत फक्त १९ धावा देऊन ३ मोठे बळी घेतले. एकेकाळी, १२.१ षटकांत, दिल्लीने फक्त ६२ धावांत ६ गडी गमावले होते. त्यानंतर आशुतोष शर्माने प्रतिआक्रमण सुरू केले आणि ट्रेस्टन स्टब्ससोबत मिळून ४७ चेंडूत ७२ धावा जोडल्या. दिल्लीने हैदराबादला १३४ धावांचे लक्ष्य दिले.

आशुतोष शर्माने २६ चेंडूत ४१ धावांची महत्त्वाची खेळी केली. त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. ट्रेस्टन स्टब्सने ३६ चेंडूत चार चौकारांसह ४१ धावा करत नाबाद राहिला. या दोघांव्यतिरिक्त, विप्राज निगमने १७ चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारून १८ धावा केल्या.

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. करुण नायर खाते न उघडताच बाद झाला. त्याला पॅट कमिन्सने बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात, फाफ डु प्लेसिसही फक्त ६ धावा करून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अभिषेक पोरेलही १० चेंडूत ८ धावा करून बाद झाला. तिघांनाही पॅट कमिन्सने बाद करून तंबूत पाठवले.

जेव्हा १५ धावांवर तीन विकेट पडल्या, तेव्हा केएल राहुल आणि कर्णधार अक्षर पटेलकडून सर्वांना मोठ्या आशा होत्या, परंतु त्यांच्या फलंदाजांनाही चांगली कामगिरी करता आली नाही. राहुल १४ चेंडूत १० धावा काढून बाद झाला आणि अक्षर पटेल सात चेंडूत सहा धावा काढून बाद झाला. राहुलला (१०) जयदेव उनाडकट याने तर अक्षर पटेल (६) याला हर्षल पटेलने बाद केले.

२९ धावांत ५ विकेट गमावल्यानंतर, विपराज निगम आला आणि त्याने ट्रेस्टन स्टब्ससोबत ३३ धावांची भागीदारी केली. विपराज धावबाद झाला. त्याने १७ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १८ धावा केल्या. स्टब्ससाठी विपराजने आपली विकेट दिली.

६२ धावांत ६ विकेट गमावल्यानंतर, आशुतोष शर्माने प्रतिआक्रमण सुरू केले. आशुतोषने २६ चेंडूत ४१ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि ३ षटकार लागले. ट्रेस्टन स्टब्सने ३६ चेंडूत चार चौकारांसह ४१ धावा करत नाबाद राहिला. दोघांनीही ४५ चेंडूत ६६ धावा जोडल्या.

हैदराबादकडून कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. याशिवाय जयदेव उनाडकट, हर्षल पटेल आणि इशान मलिंगा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *