
पार्थ स्पोर्ट्स इंडिया फाऊंडेशनतर्फे बोरीवली भागात आयोजन
मुंबई ः महाराष्ट्र युवा क्रीडा संघटना आणि पार्थ स्पोर्ट्स इंडिया फाउंडेशन यांच्या वतीने बोरीवली येथे आयोजित करण्यात आलेल्या ओपन स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ३५०पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्र युथ स्पोर्ट्स एसोशिएन आणि पार्थ इंडिया स्पोर्टस फाउंडेशन यांच्या नेतृत्वाखाली मेरा भारत, नेहरू युवा केंद्र, क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ओपन स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू युवा केंद्र महाराष्ट्र व गोवा राज्य सचिव प्रकाश मनोरे, प्रधानमंत्री योजना आत्मनिर्भरचे राष्ट्रीय सचिव रामकुमार अजित पाल, उत्तर मुंबई जिल्ह्याचे माजी खासदार गोपाल शेट्टी, जिल्हा युवा पुरस्कार विजेते आशुतोष पांडे यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदके प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

पार्थ स्पोर्ट्स इंडिया फाउंडेशनचे संस्थापक वरुण श्रीकर यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केले होते. दिव्यांगजन खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा आणखी प्रेरणादायी बनली. वरुण श्रीकर यांच्या पुढाकारामुळे एक चांगली स्पर्धा बोरीवली भागात यशस्वीरित्या संपन्न झाली.