
राजसिंग डुंगरपूर करंडक क्रिकेट ः उत्तर प्रदेशला विजेतेपद, कैफ सामनावीर
नागपूर ः पहिल्या डावातील ३०८ धावांच्या आघाडीच्या बळावर उत्तर प्रदेश संघाने १४ वर्षांखालील राजसिंग डुंगरपूर करंडक जिंकला. विदर्भ संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
या अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघाने पहिल्या डावात नऊ बाद ५०२ असा धावांचा डोंगर उभारून डाव घोषित केला. या धावसंख्येचा पाठलाग करताना गतविजेता विदर्भ संघ पहिल्या डावात ६४.२ षटकात १९४ धावांत सर्वबाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ वाया गेल्यामुळे तीन दिवसांचा अंतिम सामना अनिर्णित राहिला. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे उत्तर प्रदेश संघाला विजेता घोषित करण्यात आले. विदर्भ संघाचा कर्णधार मल्हार धुरड याने १३२ धावांची शानदार शतकी खेळी करुन आपला ठसा उमटवला. मल्हारच्या उत्कृष्ट फलंदाजीमुळे विदर्भ संघाला १९४ धावसंख्या उभारता आली. मल्हारने १७४ चेडूंचा सामना करताना १९ चौकार व पाच षटकार मारले. मल्हार धावबाद झाला.
तत्पूर्वी, उत्तर प्रदेश संघाने नऊ बाद ५०२ धावसंख्या उभारून डाव घोषित केला. मोहम्मद कैफ याने नाबाद २५० धावांची घणाघाती खेळी केली. या चमकदार खेळीमुळे कैफ हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक
उत्तर प्रदेश १४ वर्षांखालील मुलांचा पहिला डाव ः १०३.१ षटकात नऊ बाद ५०२ डाव घोषित (अर्णव बलौतिया ५३, कैफ नाबाद २५०, यशवर्धन सिंग ४३, आदित्य यादव ७०, स्पर्श धनवाजीर २-८८, अथर्व पटेल ३-१२५, मानव वाकोडे २-९१).
विदर्भ १४ वर्षांखालील मुले – पहिला डाव ६४.२ षटकांत सर्वबाद १९४ (मल्हार धुरड १३२, रुद्र शर्मा ३-३२, विष्णू सरोज ४-३३).