
एकूण २६० खेळाडूंचा सहभाग
पुणे ः पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटना व पुरंदर तालुका बॉक्सिंग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी लोणी काळभोर (पुणे) येथे आयोजित भव्य पुणे जिल्हा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे जिल्ह्याच्या हवेली, बारामती, खडकी, इंदापूर, पुरंदर, भोर, शिरूर, दौंड, मुळशी, आदी भागातील २६० खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत, असे पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.
उद्घाटन प्रसंगी प्रकाश रेणुसे, रवींद्र फटाले, चंद्रकांत मुळीक, पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष संदीप देवकाते, खजिनदार सूर्यकांत दूधभाते, सहसचिव निलेश खुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे महासचिव अभिमन्यू सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. पुरंदर तालुका बॉक्सिंग संघटनेचे विनोद कुंजीर यांनी आभार मानले.