
प्रोफेशनल ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट – वरद सुलतान सामनावीर

छत्रपती संभाजीनगर ः प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफी अंडर १४ क्रिकेट स्पर्धेत प्रदीप स्पोर्ट्स संघाने वायएल क्रिकेट अकादमी संघावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात वरद सुलतान याने सामनावीर पुरस्कार संपादन केला.

पडेगाव येथील अविनाश साळवी फाऊंडेशन क्रिकेट मैदानावर ही स्पर्धा होत आहे. अंडर १४ क्रिकेटपटूंना व्यापक खेळण्याची संधी मिळावी या हेतूने प्रोफेशनल क्रिकेट ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रोफेशनल क्रिकेट अकादमीचे मुख्य संचालक व प्रशिक्षक आदित्य नाईक यांनी सांगितले. या सामन्यात प्रदीप स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वायएल क्रिकेट अकादमी संघाला २५ षटकात नऊ बाद १२६ धावांवर रोखून प्रदीप स्पोर्ट्स संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवले. प्रदीप स्पोर्ट्स संघाने अवघ्या ९.१ षटकात एक बाद १२७ धावा फटकावत नऊ विकेट राखून दणदणीत विजय साकारला.

या सामन्यात वरद सुलतान याने २८ चेंडूत ५४ धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी केली. वरद याने नऊ चौकार व एक षटकार मारला. आयुष भेंडेकर याने १४ चेंडूंत ३७ धावांची वेगवान खेळी केली. त्याने आठ चौकार मारले. रणवीर लोंढे याने २१ चेंडूत २८ धावा फटकावल्या. त्याने दोन उत्तुंग षटकार व चार चौकार मारले.
गोलंदाजीत मयूर सोमासे याने केवळ नऊ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट घेऊन सामना गाजवला. सुमेध कांबळे याने २१ धावांत दोन गडी बाद केले. प्रेम भालेराव याने १० धावांत एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक
वायएल क्रिकेट अकादमी ः २५ षटकात नऊ बाद १२६ (राजवीर २१, अर्णव वाघोले १५, शेख झैद ५, रणवीर लोंढे २८, आदित्य एल ६, प्रेम यन्नावर १२, इतर ३६, मयूर सोमासे ३-९, सुमेध कांबळे २-२१, शाद शेख १-२०, प्रेम भालेराव १-१०) पराभूत विरुद्ध प्रदीप स्पोर्ट्स ः ९.१ षटकात एक बाद १२७ (वरद सुलतान नाबाद ५४, आरोही आहेर १५, आयुष भेंडेकर नाबाद ३७, इतर २१). सामनावीर ः वरद सुलतान.