
गया : मुलांच्या मल्लखांब सांघिक गटात सर्व संघांनी एकाचढ एक रचना सादर करून सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत उपस्थित प्रेक्षकांना अचंबित केले. अतिशय चुरशीच्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने रौप्यपदक खेचून आणले. या स्पर्धेत मल्लखांबमध्ये महाराष्ट्राला सांघिक गटात सलग सातव्या वर्षी पदक जिंकण्याचा करिश्मा घडविला आहे. याचबरोबर मुलींच्या गटात मराठमोळ्या खेळाडूंनी जोरदार कामगिरीच्या जोरावर पदकाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे.

गया शहरातील आयआयएम संस्थेच्या सभागृहात सुरू असलेल्या सांघिक मल्लखांब प्रकारात महाराष्ट्राने केवळ पाईंट ४५ गुणांनी छत्तीसगड संघाला मागे टाकत १२२.५० गुणांची कामगिरी करीत रूपेरी यश मिळविले. आयुष काळंगे, निशांत लोखंडे, ओम गाढवे, निरंजन अमृते, आर्यन आबोडकर व प्रज्ञेश तावडे यांच्या संघाने सांघिक मल्लखांबच्या तिन्ही प्रकारात चमकदार खेळाचे प्रदर्शन घडवत महाराष्ट्राला हे रौप्यपदक जिंकून दिले. मध्यप्रदेश संघाने १२३.६० गुणांची कमाई करीत सुवर्णपदक, तर छत्तिसगड संघाने १२२.०५ गुण संपादन करत कांस्यपदक मिळवले.
मुलींच्या सांघिक गटातही लक्षवेधी कामगिरी करीत महाराष्ट्राने पदकाकडे वाटचाल सुरू केली आहे. तनश्री जाधव, आर्या साळुंके, सई शिंदे, तन्वी दवणे, हदया दळवी व हिरण्या कदमने दोरीवरचा मल्लखांबात आकर्षक आणि थरारक प्रात्यक्षिके सादर करीत आघाडी कायम राखली आहे.