
पुणे ः पुणेकर आणि गिरिप्रेमीचा युवा गिर्यारोहक निकुंज शाह याने नेपाळ हिमालयातील माऊंट लोबुचे (६११९ मीटर) या उंच शिखरावर १ मे २०२५ रोजी यशस्वी चढाई केली. त्याच्या एव्हरेस्ट मोहिमेच्या स्वप्नातील हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
यापूर्वी, २०२४ मध्ये त्याने गढवाल हिमालयातील माऊंट थेलू (६००२ मीटर) या शिखरावरही यशस्वी चढाई केली आहे. निकुंज हा गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग (जीजीआयएम) च्या अव्हान निर्माण उडान (एएनयू) या प्रमुख प्रशिक्षण उपक्रमाच्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आहे. वयाच्या केवळ १० व्या वर्षी गिर्यारोहणाविषयीची आसक्ती त्याच्या मनात रूजली. आज २३ वर्षांचा असलेला निकुंज, एव्हरेस्ट शिखरावर चढाई करण्यासाठी २०२६ मधील मोहिमेची तयारी करत आहे.
प्रख्यात गिर्यारोहक उमेश झिरपे यांचे मार्गदर्शन त्याला बालपणापासून लाभले आहे. सध्या तो गिरिप्रेमी अॅडव्हेंचर फाउंडेशनमध्ये कार्यरत असून, गिर्यारोहण आणि साहसी उपक्रमांमधून तरुणांना प्रेरित करण्याचे कार्य करतो आहे.
माऊंट लोबुचेवरील यशस्वी चढाई ही त्याच्या सातत्य, निष्ठा आणि कठोर परिश्रमाचे प्रतीक आहे. गिरिप्रेमी आणि जीजीआयएम परिवाराकडून निकुंज याच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि २०२६ मधील एव्हरेस्ट मोहिमेसाठी हार्दिक शुभेच्छा!