आदिती हेगडेचे सुवर्ण हॅटट्रिकसह पाच पदकांची कमाई 

  • By admin
  • May 6, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राने पटकावली आठ पदके

गया : महाराष्ट्राच्या आदिती हेगडे हिचा सलग दुसर्‍या दिवशी सातव्या खेलो इंडिया स्पर्धेत डंका बघायला मिळाला. तिने सुवर्ण पदकांच्‍या हॅटट्रिकसह स्पर्धेत ५ पदकांची कमाई करण्याचा पराक्रम केला. जलतरणात महाराष्ट्राने दुसर्‍या दिवशी पदकांची अष्टमी साजरी केली.

गया शहरातील बीआयपीएआरडीच्या जलतरण तलाव परिसरात महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. ४०० मीटर  फ्री स्टाईल व १०० मीटर बटरफ्लाय व रिले  प्रकारात मुंबईच्या आदितीने ३ सुवर्णपदके जिंकून आपली हुकुमत गाजविली. रिले संघाने सुवर्ण, समृद्धी जाधव व अथर्वराज पाटीलने रौप्य, अर्णव कडू, श्लोक खोपडे व झारा बक्षीने कांस्य पदकांची कमाई करून दिवस गाजविला.

आदिती हेगडेने ४०० मीटर फ्री स्टाईल शर्यत ४.३२.८७ वेळेत पूर्ण करीत सुवर्ण कामगिरी केली. दिल्लीच्या तितिक्षा रावतला रौप्य तर कर्नाटकच्या श्री चरणीला कांस्य पदक मिळाली. अपेक्षेप्रमाणे १०० मीटर बटरफ्लाय प्रकारातही अव्व्वल स्थान गाठून आदितीने बाजी मारली. सुरूवातीपासून आघाडी घेत १.०४.७३ वेळेत शर्यत जिंकून स्पर्धेतील चौथ्या पदकावर तीने शिक्कामोर्तब केला. गत तामिळनाडू स्पर्धेतही पदकांचा चौकार झळकावण्याचा करिश्मा तिने घडविला होता. कर्नाटकची सुहासिनी घोश हिने रौप्यपदक जिंकले, तर महाराष्ट्राची झारा बक्षी कांस्यपदकाची मानकरी ठरली. 

मुलींच्या २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात महाराष्ट्राच्या समृद्धी जाधव हिने २ मिनिटे ४९.२१ सेंकद वेळेसह रौप्यपदक जिंकले. तामिळनाडूच्या श्रीनिथी नाटेसन हिने २ मिनिटे ४४.४१ सेंकद वेळ नोंदवित सुवर्णपदकावर कब्जा केला, तर बंगालच्या पृथा देबनाथ हिला २ मिनिटे ४९.९५ सेंकद वेळेसह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलांच्या दीड हजार मीटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या अथर्वराज पाटीलला १६ मिनिटे ३८.३६ सेंकद वेळेसह रौप्यपदक मिळाले. आंध्र प्रदेशच्या गोट्टीटी यादवने १६ मिनिटे ३०.५७ सेंकद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर छत्तीसगढच्या पार्थ श्रीवास्तवला १६ मिनिटे ५२.६९ सेंकद वेळेसह कांस्यपदक मिळाले.

मुलांच्या २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात श्लोक खोपडे याने २ मिनिटे २५.५३ सेंकद वेळ नोंदवित महाराष्ट्राला कांस्य पदक जिंकून दिले. कर्नाटकच्या सूर्या झोयप्पा याने २ मिनिटे २४.५५ सेंकद वेळेसह सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर त्याचाच राज्य सहकारी क्रिश सूकुमारने २ मिनिटे २५.०६ सेंकद वेळेसह रूपेरी यश संपादन केले.
मुलांच्या ४०० मीटर मेडले प्रकारात महाराष्ट्रच्या अर्णव कडू याने ४ मिनिटे ४४.७४ सेंकद वेळेसह कांस्यपदकावर मोहर उमटवली. तेलंगनाच्या वर्षिथ धुलीपुुडी याने ४ मिनिटे ३८.३९ सेंकद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले. आंध्र प्रदेशच्या मोंगम सामदेवला ४ मिनिटे ३८.८७ सेंकद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या फ्री स्टाईल रिलेत सुवर्ण
आदिती हेगडे, सारा बक्षी, श्रीलेखा पारीख व अल्फेया धनसुरा या महाराष्ट्राच्या  मुलींच्या संघाने जलतरण विभागातील ४ बाय १०० मीटर फ्री स्टाईल रिले ४ मिनिटे ०१.९१ सेंकद वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले. कर्नाटकच्या संघाला ४ मिनिटे ०२.४७ सेंकद वेळेसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर तामिळनाडूला ४ मिनिटे ०९.६४ सेंकद वेळेसह कांस्यपदक मिळाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *