
रोमहर्षक सामन्यात गुजरात तीन विकेटने विजयी; सलग सहा विजयानंतर मुंबई पराभूत
मुंबई : मुसळधार पावसाने गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात रोमांचक बनवला. एका षटकात १५ धावांचे लक्ष्य दिलेले असताना कोएत्झी याने चहर याला षटकार ठोकून मुंबईचा पराभव निश्चित केला. शेवटच्या चेंडूवर धावबादची संधी मुंबईने गमावली आणि गुजरात टायटन्स संघाने ३ विकेट राखून रोमहर्षक लढत जिंकली. चहर याने राहुलला धावबाद करण्यासाठी चपळता दाखवली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता.
गुजरात टायटन्स संघासमोर विजयासाठी १५६ धावांचे लक्ष्य होते. मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी प्रभावी स्पेल टाकला व पॉवर प्लेमध्ये गुजरात संघाला फारशा धावा काढू दिल्या नाही. साई सुदर्शन अवघ्या ५ धावांवर बाद झाला. बोल्ट याने त्याला बाद करुन संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर जोस बटलर व शुभमन गिल या धमाकेदार फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करुन संघाच्या विजयाचा पाया भक्कमपणे रचला. बटलर ३० धावांवर बाद झाला. त्याने २७ चेंडूंत तीन चौकार व एक षटकार मारला. अश्वनी कुमार याने बटलरला बाद केले. १४ षटकानंतर गुजरात संघ दोन बाद १०७ अशा स्थितीत असताना पावसाचे आगमन झाले.
पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला तेव्हा लगेचच बुमराह याने एका अप्रतिम चेंडूवर शुभमन गिल याला ४३ धावांवर बाद केले. गिल याने ४६ चेंडूत ४३ धावा फटकावल्या. गिलने तीन चौकार व एक षटकार मारला. रदरफोर्ड याला बोल्ट याने पायचीत बाद करुन गुजरातला धक्का दिला. त्याने १५ चेंडूत दोन चौकार व दोन षटाकर ठोकत २८ धावांचे योगदान दिले. गिल-रदरफोर्ड हे लागोपाठ बाद झाल्यानंतर राहुल तेवतिया व शाहरूख खान या जोडीवर भिस्त होती. परंतु, शाहरूख खान याला बुमराह याने ६ धावांवर क्लिन बोल्ड करुन सामन्यात रंगत आणली. अश्वनी कुमार याने सुरेख यॉर्कर चेंडूवर रशीद खान (२) याला पायचीत बाद करत सामना अधिकच रोमांचक बनवला.
१८ षटकानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली तेव्हा गुजरातची स्थिती सहा बाद १३२ अशी होती. डकवर्थ लुईस नियमानुसार गुजरात संघ चार धावांनी मागे होते. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा एकदा खेळ सुरू झाला. तेव्हा गुजरातला एका षटकात १५ धावांची गरज होती. राहुल तेवतिया याने चौकार मारुन सुरेख सुरुवात केली. त्यानंतर कोएत्झी याने उत्तुंग षटकार मारत संघाला विजयासमीप आणले.
चहर याने थोडी चपळता दाखवली असती तर मुंबई सामना जिंकू शकला असता. गुजरात संघाकडून बोल्ट (२-२२), बुमराह (२-१९) व अश्वनी कुमार (२-२८) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेऊन सामना रोमांचक बनवला.
मुंबईची फलंदाजी गडगडली
गुजरात टायटन्स संघाच्या अचूक आणि प्रभावी गोलंदाजीसमोर घरच्या मैदानावर खेळाताना मुंबई इंडियन्स संघाचा डाव गडगडला. मुंबई संघ २० षटकात आठ बाद १५५ असे माफक लक्ष्य उभे करू शकला.
रिकेल्टन व रोहित शर्मा ही धमाकेदार फलंदाजी करणारी जोडी मैदानात उतरली. मात्र, आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात रिकेल्टन (२) व रोहित (७) हे स्वस्तात बाद झाले. सिराज याने रिकेल्टन याला तर अर्शद खान याने रोहितला बाद करुन मुंबईला मोठा धक्का दिला.
विल जॅक्स व सूर्यकुमार यादव या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र, साई किशोर याने सूर्यकुमार यादवची आक्रमक खेळी ३५ धावांवर संपुष्टात आणली आणि त्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. सूर्यकुमार यादवने २४ चेंडूत ३५ धावा फटकावल्या. त्याने पाच चौकार मारले. विल जॅक्स याने सर्वाधिक ५३ धावांची खेळी साकारली. जॅक्स याने ३५ चेंडूत पाच चौकार व तीन टोलेजंग षटकार ठोकले.
जॅक्स याला बाद करुन रशीद खान याने मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तिलक वर्मा (७), कर्णधार हार्दिक पंड्या (१), नमन धीर (७) ही मधळी फळी गडगडली. कॉर्बिन बॉश याने २२ चेंडूत २७ धावांची आक्रमक खेळी केली. तो धावबाद झाला. त्याने दोन षटकार व एक चौकार मारला. दीपक चहर (८) व कर्ण शर्मा (१) हे नाबाद राहिले.
गुजरात संघाकडून सर्व गोलंदाजांनी प्रभावी स्पेल टाकला. साई किशोर याने ३४ धावांत दोन गडी बाद केले. सिराज (१-२९), अर्शद खान (१-१८), प्रसिद्ध (१-३७), रशीद खान (१-२१), जेराल्ड कोएत्झी (१-१०) यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.