
छत्रपती संभाजीनगर ः पुणे येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या तसेच ऑरझुव फिटनेस यांच्या वतीने आयोजित महा स्विम चॅम्पियनशिप स्पर्धेत एमजीएम विद्यापीठाचा विद्यार्थी वरद गावंडे याने तसेच एमजीएम स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू इरा पंडित हिने ५० मीटर फ्रीस्टाइल तसेच १०० मीटर फ्री स्टाइल या प्रकारांमध्ये प्रत्येकी दोन सुवर्णपदक पटकावले. तसेच एमजीएम विद्यापीठाचे क्रीडा विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांनी ५० मीटर बटरफ्लाय यामध्ये सुवर्ण पदक तर ५० मीटर बायफिन्स या इव्हेंट मध्ये कांस्यपदक पटकावले.
यापूर्वी वरद गावंडे याने अनेक जलतरण स्पर्धेमध्ये पदकांची लयलूट केलेली आहे. तसेच एमजीएम विद्यापीठाचे साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ जलतरण स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केलेले आहे, तसेच इरा पंडित ही देखील अनुभवी जलतरणपटू आहे. तसेच डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांनी यापूर्वी अनेक स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत होणाऱ्या मास्टर्स राष्ट्रीय जलतरण स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे, तसेच अनेक ओपन वॉटर सागरी जलतरण स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला आहे.
डॉ श्रीनिवास मोतीयेळे यांना ट्रायथलॉन या खेळाचे आंतरराष्ट्रीय टेक्निकल ऑफिसर आणि स्विमिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगरचे अभय देशमुख यांचे तर वरद आणि इरा यांना जलतरण प्रशिक्षक अजय भोजने, आनंद राजहंस यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
या यशाबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू प्रोफेसर डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर, आंतर विद्याशाखेचे अधिष्ठाता जॉन चेल्लादुराई, एमजीएम ट्रस्टचे क्रीडा संचालक नितीन घोरपडे, एमजीएम विद्यापीठाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ दिनेश वंजारे, डॉ शशिकांत सिंग, डॉ सदाशिव जवेरी, एमजीएम स्पोर्ट्स क्लबचे जॉय थॉमस, प्रवीण शिंदे, रहीम खान, निलेश खरे तसेच स्विमिंग असोसिएशन ऑफ छत्रपती संभाजीनगरचे सर्व पदाधिकारी यांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.