
अंतिम सामन्यात विहंग क्रीडा मंडळ संघावर मात
नवी मुंबई : पुण्याचा नवमहाराष्ट्र संघ आणि यजमान विहंग क्रीडा मंडळ यांच्यात रंगलेली मनीष स्मृती चषकाची अंतिम लढत ही प्रेक्षकांची श्वास रोखणारी ठरली. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने विहंग क्रीडा मंडळाच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या राज्यस्तरीय निमंत्रित पुरुष खो-खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नवमहाराष्ट्रने जबरदस्त खेळी करत यजमान संघावर १६-१३ असा तीन गुणांनी रोमांचक विजय मिळवला आणि प्रतिष्ठेचा मनीष स्मृती चषक आपल्या नावावर केला.
ही थरारक अंतिम लढत ऐरोली येथील श्रीमती राधिका मेघे विद्यालयाच्या मैदानावर पार पडली. प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक खेळाचा सपाटा लावत प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मात्र अखेरच्या क्षणी पुण्याच्या नवमहाराष्ट्र संघाने संयम आणि कौशल्य दाखवत बाजी मारली.
नवमहाराष्ट्रच्या विजयामध्ये राहुल मंडल याने (३.१०, १.५० मिनिटे संरक्षण व २ गुण) मोलाचा वाटा उचलला. त्याला साथ दिली ती अथर्व ढाणे (२.१० मि. संरक्षण), मिलिंद कुरपे (१.१० व नाबाद १.२० मि. संरक्षण व १ गुण), सुयश गरगटे (३ गुण), रुद्र थोपटे (५ गुण), ऋषभ वाघ (१.५० मि. संरक्षण व १ गुण), आणि प्रतिक वाईकर (१, १.३० मि. संरक्षण व ३ गुण) या खेळाडूंनी.
दुसरीकडे, यजमान विहंग क्रीडा मंडळानेही जिद्दीने झुंज दिली. गजानन शेंगाळ (१.३०, १.२० मि. संरक्षण व ३ गुण), लक्ष्मण गवस (१.३०, २.२० मि. संरक्षण व २ गुण), महेश शिंदे (२ मि. संरक्षण व १ गुण), आकाश तोगरे (१.३० मि. संरक्षण), अनंत साठले (१.२० मि. संरक्षण), आणि आकाश कदम (३ गुण) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र नवमहाराष्ट्रच्या तुफानी खेळीसमोर त्यांची झुंज अपुरी पडली.
या दिमाखदार विजयाने नवमहाराष्ट्र संघाने आपल्या नावावर आणखी एक मानाचा किताब लिहून इतिहासात नोंद केली. खो-खोप्रेमींनी या सामन्याचा मनमुराद आनंद घेतला आणि मैदान दणाणून टाकलं.