एसआर व्हेंचर्स संघाची दणदणीत विजयी सलामी

  • By admin
  • May 7, 2025
  • 0
  • 67 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर अंडर १४ प्रीमियर लीग ः समर्थ जोशी सामनावीर

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला बुधवारी शानदार सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात एसआर व्हेंचर्स संघाने छत्रपती फायटर्स संघाचा सहा विकेट राखून पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात शानदार फलंदाजी करणारा समर्थ जोशी हा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल पाटील व जाधव क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक संदीप जाधव यांनी शहरात पहिल्यांदा अंडर १४ फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्यानिमित्ताने अंडर १४ खेळाडूंना अधिक स्पर्धात्मक क्रिकेट खेळण्याचे व्यासपीठ उपलब्ध होत असल्याचे राहुल पाटील व संदीप जाधव यांनी सांगितले.

या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात छत्रपती फायटर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारत २० षटकात नऊ बाद १२८ धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना एसआर व्हेंचर्स संघाने १६.१ षटकात चार बाद १३२ धावा फटकावत सहा विकेट राखून सामना जिंकला.

या सामन्यात समर्थ जोशी याने दमदार फलंदाजी केली. समर्थ याने ४२ चेंडूंचा सामना करत ७६ धावांची बहारदार खेळी केली. त्याने अर्धशतक साजरे करताना तीन उत्तुंग षटकार व दहा चौकार मारले हे विशेष. विरेन डहाळे याने ५३ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत १२ चौकार व एक षटकार मारला. साई गुंड याने २२ चेंडूत २१ धावांची वेगवान खेळी केली. त्याने दोन चौकार मारले.

गोलंदाजीत चिन्मय श्रीवास्तव याने २३ धावांत तीन विकेट घेऊन आपला ठसा उमटवला. साई गुंड याने २१ धावांत दोन बळी घेत अष्टपैलू कामगिरी बजावली. देवव्रत पवार याने १७ धावांत एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

छत्रपती फायटर्स ः २० षटकात नऊ बाद १२८ (देवव्रत पवार ५, विरेन डहाळे ७१, सत्यजीत १६, प्रथमेश चेके ९, वीर यादव नाबाद ७, इतर १७, चिन्मय श्रीवास्तव ३-२३, साई गुंड २-२१, समर्थ जोशी १-२४, सुयोग घनवट १-३१, अनुज १-७) पराभूत विरुद्ध एसआर व्हेंचर्स ः १६.१ षटकात चार बाद १३२ (साई गुंड २१, समर्थ जोशी नाबाद ७६, चिन्मय श्रीवास्तव ८, इतर १८, विरेन डहाळे १-२८, आयुष गायकवाड १-३५, मयूर सोमासे १-१६, देवव्रत पवार १-१७). सामनावीर ः समर्थ जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *