जालना ः राज्यस्तरीय २० वर्षांखालील (ज्युनियर) ओपन अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जालना संघ निवडण्यासाठी ११ मे रोजी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य ज्युनियर (२० वर्षांखालील) ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा १७ व १८ मे या कालावधीत संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावर नागपूर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे पुरुष व महिला अशा वेगळ्या गटात आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्ह्याची निवड चाचणी रविवार ११ मे रोजी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, जिल्हा परिषद प्रशाला (मुलांची), रेल्वे स्टेशन रोड, जालना या ठिकाणी सकाळी ८ वाजता ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये २० वर्षांखालील गटासाठी ज्यांचा जन्म ३० मे २००५ ते २९ मे २००७ झालेला आहे असे खेळाडू भाग घेऊ शकतात. खेळाडूंनी स्पर्धेला येताना जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीचे मूळ प्रमाणपत्र, आधारकार्ड सोबत घेऊन यावे. तसेच जालना जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन जालना जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव डॉ बाबु यादव, प्रमोद खरात, एकनाथ सुरुशे, संतोष मोरे, विकास काळे यांनी केले आहे.