पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत एचके पावरहाऊस संघाला विजेतेपद

  • By admin
  • May 7, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

पुणे ः पूना क्लब लिमिटेड यांच्यातर्फे आयोजित पाचव्या पूना क्लब रॅकेट लीग स्पर्धेत अंतिम फेरीत एचके पावरहाऊस संघाने स्टॅश प्रो परमार ऑल स्टार्स संघाचा २६७-२५४ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले.

पूना क्लबच्या टेबल टेनिस, लॉन टेनिस, बॅडमिंटन, स्क्वॅश, पिकलबॉल कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत एचके पावरहाऊस संघाने स्टॅश प्रो परमार ऑल स्टार्स संघाचा २६७-२५४ असा पराभव केला. सामन्यात बॅडमिंटन प्रकारात मृणाल शहा, पंकज शहा, विकास जी, सुशांत पवार, बेदी रिवजोत, अद्विका परमार यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर ऑल स्टार्स संघाने पावरहाऊसचा ६८-६३ असा पराभव करून संघाचे खाते उघडले. 

टेनिस प्रकारात रक्षय, अवीव, जयदीप दाते, करण यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पावरहाऊस संघाने ऑल स्टार्सचा ६०-४२ असा तर, टेबल टेनिसमध्ये जयदीप दाते, करण शर्मा, साहिल हांडा, किरण संघवी यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर पावरहाऊस संघाने ऑल स्टार्सचा ६२-६० असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. स्क्वॅशमध्ये ऑल स्टार्स संघाने पावरहाऊस संघाचा ४१-२७ असा पराभव करून ही आघाडी कमी केली.

पिकलबॉल स्पर्धेत रक्षय, जयदीप, मनप्रीत उप्पल, अविव यांच्या कामगिरीच्या जोरावर एचके पावर हाऊस संघाने ऑल स्टार्सचा ५५-४३ असा पराभव करून संघाचा विजय सुकर केला.

तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत एएसआर स्ट्रायकर्स संघाने वेकफील्ड डिलाइट्स संघाचा २७६-२३६ असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला. 

स्पर्धेतील विजेत्या एचके पावर हाऊस संघाला व उपविजेत्या स्टॅश प्रो परमार ऑल स्टार्स संघाला करंडक अशी पारितोषिके  देण्यात आली. याशिवाय तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या एएसआर स्ट्रायकर्स संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पूना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष गौरव गढोक, उपाध्यक्ष इंद्रनील मुजगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी क्लबचे क्रीडा विभागाचे चेअरमन व रॅकेट लीगचे चेअरमन तुषार आसवानी, स्पर्धा संचालक रणजीत पांडे आणि पूना क्लब लिमिटेडचे समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *