
मुंबई ः मिळालेल्या संधीचा लाभ न उठविल्यास तुम्हाला इतरांना दोष देता येणार नाही तर त्यासाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल, असे भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले.
ओव्हल मैदान, चर्चगेट येथील ड्रीम ११ कपसाठी खेळविण्यात आलेल्या १२ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमीतर्फे मुंबईतील विविध वयोगटातील मुलांसाठी अधिकाधिक स्पर्धांचे आयोजन करून या मुलांना आपल्यातील कौशल्य दाखविण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म मिळवून देतो आणि या गोष्टीचा लाभ उठविणे हे सर्वस्वी या छोट्या खेळाडूंच्या हातात असते, असे दिलीप वेंगसरकर यांनी पुढे सांगितले.
यावेळी माजी क्रिकेटपटू मेहेरनोश दारूवाला यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना युवा खेळाडूंनी लाल चेंडूने खेळले जाणाऱ्या परंपरागत क्रिकेटवरच अधिक लक्ष्य केंद्रित करण्याचा सल्ला दिला. क्रिकेटचे प्राथमिक तंत्र योग्य प्रकारे घोटविले तरच तुम्ही खेळाच्या अन्य प्रारूपात देखील यशस्वी होऊ शकाल असे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबईचे माजी रणजीपटू मनोज जोगळेकर आणि ड्रीम स्पोर्ट्सचे प्रशांत तायडे देखील उपस्थित होते. दरम्यान गणेश पालकर क्रिकेट क्लबने गोएंका असोसिएट्स एजुकेशनल ट्रस्ट संघावर आठ विकेट्सनी मात करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
गोएंका असोसिएट्स एजुकेशनल ट्रस्ट संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण ३०.२ षटकांतच त्यांचा डाव ८१ धावांतच आटोपला. प्रसंजय सावंत (१४), विहान सरमळकर (१३) आणि अर्जुन (नाबाद १२) या तिघांनाच दोन आकडी धावा करता आल्या. आदित्य जरे (१० धावांत ३ बळी), वरद गोवारी (८ धावांत २ बळी) आणि झैब शेख (१३ धावांत २ बळी) यांच्या अचूक गोलंदाजीने ही करामत केली. या आव्हानाचा पाठलाग करताना गणेश पालकर क्रिकेट क्लब संघाने १६.३ षटकातच २ बाद ८२ धावांची मजल मारून विजेतेपदाला गवसणी घातली. लीला संघवी (२३) आणि वेद पावणेकर (२९) यांनी ६२ धावांची सलामी देत संघाचा विजय निश्चित केला आणि मानस कारखानीस याने नाबाद १२ धावांच्या खेळीने विजयाचा कळस चढविला.
अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू आणि स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून आदित्य जरे (९ बळी) याची निवड करण्यात आली. स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून तसेच सर्वोत्तम खेळाडू म्हणून पटेल सी सी संघाच्या रुद्र पाबळे (३ डावात २१७ धावा) याला गौरविण्यात आले तर सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून अर्जुन खेडकर (वेंगसरकर क्रिकेट अकादमी, माहुल) याला गौरविण्यात आले. दिलीप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू मेहेरनोश दारूवाला, माजी रणजीपटू मनोज जोगळेकर आणि ड्रीम स्पोर्ट्सचे प्रशांत तायडे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक
गोएंका अससोसिएट्स एजुकेशनल ट्रस्ट ः ३०.२ षटकांत सर्वबाद ८१ (प्रसंजय सावंत १४, विहान सरमळकर १३, अर्जुन नाबाद १२; आदित्य जरे १० धावांत ३ बळी, वरद गोवारी ८ धावांत २ बळी, झैब शेख १३ धावांत २ बळी) पराभूत विरुद्ध गणेश पालकर क्रिकेट क्लब ः १६.३ षटकांत २ बाद ८२ (लीला संघवी २३, वेद पावणेकर २९, मानस कारखानीस नाबाद १२). सामनावीर ः आदित्य जरे.