
भागलपूर (बिहार) : खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेच्या सातव्या पर्वात तिरंदाजीमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंचा बोलबाला बघायला मिळाला. मराठमोळ्या तिरंदाजांनी तब्बल सहा सुवर्ण, २ रौप्य व एक कांस्य अशी एकूण ९ पदकांची लयलूट करीत सर्वसाधारण विजेतेपदही पटकाविले.

गतवर्षी चेन्नईतील स्पर्धेत महाराष्ट्र या क्रीडा प्रकारात उपविजेता ठरला होता. खेलो इंडियाच्या इतिहासात प्रथमच पदकांचा षटकार महाराष्ट्राने झळकविला आहे. गतवेळी ३ सुवर्णांसह ६ पदके महाराष्ट्राने जिंकली होती. यंदा झारखंड, हरियाणाची मक्तेदारी मोडून महाराष्ट्राने वर्चस्व गाजवित सर्वसाधारण विजेतेपदाचर नाव कोरले. विजेत्या खेळाडूंचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह पथकप्रमुख महादेव कसगावडे यांनी अभिनंदन केले आहे.
मुलांच्या रिकर्व प्रकारात उज्वल ओलेकरने तामिळनाडूच्या स्मारा सर्वेशचा ६-२ सेटने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. मेघालयाचा देवराज मोहपात्रा कांस्य पदकाचा मानकरी ठरला. मुलींच्या रिकर्व प्रकारात शर्वरी शेंडे व वैष्णवी पवार या महाराष्ट्राच्या तिरंदाजांमध्येच अंतिम लढत रंगली. शर्वरीने ६-४ सेटने बाजी मारत सुवर्णपदक जिंकले, तर वैष्णवी रौप्य पदकाची मानकरी ठरली. झारखंडच्या तमन्ना वर्मा हिला कांस्यपदक मिळाले. याचबरोबर रिकर्वच्या मिश्र प्रकारातही महाराष्ट्राने सोने लुटले. ज्ञानेश चेराळे व शर्वरी शेंडे या महाराष्ट्रीयन जोडीने सुवर्णपदकाच्या लढतीत हरयाणाच्या दक्ष मलिक व अन्नू या जोडीचा ५-३ सेटने पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. कोडांडपानी जथ्या व तोडीबोइना वैष्णवी ही आंध्र प्रदेशची जोडी कांस्यपदकाची मानकरी ठरली.
मुलींच्या कपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी तीनही पदके जिंकून निर्भेळयश मिळविले. प्रीतिका प्रदीप हिने सुवर्णपदकाच्या लढतीत राज्य सहकारी तेजल साळवे हिच्यावर एक-एक गुणांसाठी रंगलेल्या पाठशिवणीच्या खेळात १४५-१४४ अशी एका गुणाने बाजीमारली. तेजल रौप्य पदकाची मानकरी ठरली, तर वैदेही जाधव हिने कांस्यपदकाची कमाई केली.
मुलांच्या कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या मानव जाधवने चुरशीच्या अंतिम लढतीत झारखंडच्या दिवांशू सिंगचा १४५-१४४ असा एका गुणाने पराभव करीत सुवर्णपदक जिंकले. राजस्थानचा देवांश सिंग कांस्य पदकाचा मानकरी ठरला. कंपाऊंड मिश्र प्रकारात मानव जाधव व तेजल साळवे या जोडीने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले. महाराष्ट्राच्या जोडीकडून १५२-१५१ असा एका गुणाने पराभव झालेल्या तामिळनाडूच्या मधुरावर्षीनी व आर मिधुन जोडीला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. आदित्य मित्तल व दृष्टी या दिल्लीच्या जोडीला कांस्यपदक मिळाले. शुभांगी रोकडे-दळवी, सुधीर पाटील, सागर मोरे, त्रिशा संचिती यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या तिरंदाजांनी ही खेलो इंडिया युवा स्पर्धेतील मोहीम फत्ते केली.