
तिरंगी क्रिकेट मालिका ः जेमिमा रॉड्रिग्जचे धमाकेदार शतक
कोलंबो ः भारतीय महिला संघाने चारपैकी तीन सामने जिंकून तिरंगी क्रिकेट मालिकेत अंतिम फेरी गाठली आहे. जेमिमा रॉड्रिग्जच्या बहारदार शतकाच्या बळावर भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा २३ धावांनी पराभव करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. आता ११ मे रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात विजेतेपदासाठी सामना होईल.
भारतीय महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात नऊ बाद ३३७ असा धावांचा डोंगर उभारला. यात जेमिमा रॉड्रिग्ज हिने धमाकेदार १२३ धावांची खेळी केली. तिने १०१ चेंडूंत १५ चौकार व एक षटकार मारला. दीप्ती शर्मा हिने ८४ चेंडूत ९३ धावांची वेगवान खेळी केली. तिचे शतक अवघ्या सात धावांनी हुकले. दीप्तीने दोन षटकार व दहा चौकार मारले.
स्मृती मानधना हि ने ६३ चेंडूत ५१ धावा फटकावल्या. तिने सहा चौकार मारले. प्रतिका रावल (१), हरलीन देओल (४), हरमनप्रीत कौर (२८), रिचा घोष (२०), अमनजोत कौर (५), श्री चरणी (६) यानी आपापले योगदान दिले. दक्षिण आफ्रिका संघाकडून मसाबाटा क्लास (२-५१), नॅडिन डी क्लार्क (२-५४), म्लाबा (२-७१) यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिका संघासमोर विजयासाठी ३३८ धावांचे आव्हान होते. आफ्रिका संघ ५० षटकात सात बाद ३१४ धावा काढू शकला. अॅनेरी डर्कसेन हिने सर्वाधिक ८१ धावा काढल्या. तिने पाच चौकार व दोन षटकार मारले. कर्णधार क्लो ट्रायॉन हिने ४३ चेंडूत ६७ धावा फटकावत संघाच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले. ब्रिट्स (२६), स्मित (३९), शांगसे (३६), जाफ्ता (२१), क्लार्क (नाबाद २२) यांनी आपापले योगदान दिले. भारतीय संघाकडून अमनजोत कौर (३-५९), दीप्ती शर्मा (२-१५) यांनी प्रभावी मारा करत संघाला विजय मिळवून दिला.