नेमबाजीत प्राची गायकवाड, वेदांत वाघमारेचा ‘सुवर्ण’वेध

  • By admin
  • May 7, 2025
  • 0
  • 33 Views
Spread the love

नवी दिल्ली : वेदांत वाघमारे आणि प्राची गायकवाड या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या ५० मीटर थ्री पोझीशन रायफल प्रकारात अचूक निशाणा साधताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. खेलो इंडियाच्या इतिहासात ५० मीटर थ्री पोझीशन प्रकारात पदक जिंकणारा वेदांत  वाघमारे हा पहिला नेमबाज ठरला. त्यामुळे महाराष्ट्रासाठी हे ऐतिहासिक पदक ठरले.

नवी दिल्लीतील डॉ कर्णी सिंग शुटींग रेंजवर महाराष्ट्रासाठी बुधवारी गोल्डन दिवस ठरला. नेवासा सारख्या (अहिल्यानगर) ग्रामीण भागातील वेदांत वाघमारेने ५० मीटर थ्री पोझीशन रायफल प्रकारात मुलांच्या विभागात ४५२.५ गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. हरियाणाचा रोहित कन्यान ४५१.९ गुणांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. पंजाबच्या अमितोज सिंगला ४४०.१ गुणांसह कांस्यपदक मिळाले. नेवासा फाट्यावरील त्रिमूर्ती कॉलेजमध्ये शिकणारा वेदांत वाघमारे सध्या पुण्यातील बालेवाडी येथे किरण खंदारे व बिबासवान गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याला तिसर्‍या प्रयत्नात खेलो इंडिया स्पर्धेत पदकाला गवसणी घालण्यात यश मिळाले. याआधीच्या दोन्ही स्पर्धेत वेदांत याने अंतिम फेरी गाठली होती. मात्र, दोन्ही वेळेस त्याला पदकाने हुलकावणी दिली होती. तिसर्‍या प्रयत्नात अखेर त्याचे पदक जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरले.  

मुंबईच्या प्राची गायकवाड हिने ५० मीटर थ्री पोझीशन रायफल प्रकारात मुलींच्या विभागात ४५८.४ गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. कर्नाटकच्या टिलोट्टमा सेन हिला ४५५.६ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिचीच राज्य सहकारी अनुष्का ठोकुर हिने ४४५.७ गुणांसह कांस्यपदक जिंकले. माटूंगा येथील गुरूनानक खालसा कॉलेजची विद्यार्थींनी असलेली  मुंबईची प्राची गायकवाड ही अरूण वारेशी व बिबासवान गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. खेलो इंडिया र्स्पेर्धेतील तिचे हे दुसरे पदक होय. गत चेन्नईतील स्पर्धेत प्राचीला कांस्यपदक मिळाले होते. यावेळी तिने आपल्या पदकाचा रंग हा सोनेरी करून दाखविला.

कोट 
खेलो इंडिया युवा स्पर्धेत नेमबाजीतील मुलांच्या ५० मीटर थ्री पोझीशन रायफल प्रकारात आतापर्यंत महाराष्ट्राला एकही पदक नव्हते. अखेर स्पर्धेच्या सातव्या पर्वात मी महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्यात यशस्वी ठरलो. त्यामुळे साहजिकच आनंद झालाय. त्रिमूर्ती कॉलेजकडून सरावासाठी मिळालेली मोकळीक. वडिलांचे (नितीन वाघमारे) पाठबळ आणि सर्व मार्गदर्शक आणि महाराष्ट्र शूटिंग टीमचे व्यवस्थापक यांच्या मदतीच्या जोरावर मला हे सोनेरी यश मिळाले, अशी माझी भावना आहे.

  • वेदांत वाघमारे, नेमबाज. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *