
शाळांना वाटप करण्याचे २०१७ चे फुटबॉल अजूनही क्रीडा कार्यालयात
ए बी संगवे
सोलापूर ः राज्यातील सर्व शाळांना २०१७ मध्ये प्रत्येकी तीन फुटबॉल देण्याचे राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने ठरवले होते. परंतु अजूनही काही मोठे बॉक्स फुटबॉल जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या गोडाऊनमध्ये पडून आहेत. त्यामुळे शासनाचे प्रत्येक शाळांनी फुटबॉल खेळावे हे उद्दिष्ट कागदावरच राहिले आहे.
भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने वातावरण तयार होण्यासाठी राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने एकाच दिवशी म्हणजे १० लाख विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळावे असे नियोजन १५ सप्टेंबर २०१७ मध्ये केले होते. यासाठी राज्य शासनाने प्रत्येक शाळांना तीन फुटबॉल देण्याचे जाहीर केले होते. यासाठी सोलापूर शहर जिल्ह्यातून १०१२ शाळांंची ऑनलाइन नोंदणी झाली होती. त्यानुसार १५ सप्टेंबरला सकाळी तालुक्यात संबंधित गटशिक्षणाधिकारी शहरात महानगरपालिका प्रशासन अधिकारी यांच्याकडे हे फुटबॉल पोहचविण्यात आले असल्याचे तत्कालीन जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांचा दावा होता. सर्व शाळांना प्रत्येकी ३ प्रमाणे ३०३६ फुटबॉल वाटप झाल्याचा अहवालही त्याने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला होता. परंतु फुटबॉलचे तीन ते चार मोठे बॉक्स जिल्हा क्रीडा कार्यालयात पडून होते. याबाबतचे वृत्त सप्टेंबर २०१७ मध्ये वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर याची चौकशी झाली होती. ती चौकशी कागदावरच राहिली आणि अजूनपर्यंत क्रीडा कार्यालयात हे फुटबॉल शिल्लक आहेत.
याची चौकशी कोण करणार?
युवराज नाईक यांच्यानंतरही नितीन तारळकर व नरेंद्र पवार हे दोन जिल्हा क्रीडा अधिकारी आले. परंतु त्यांचेही लक्ष क्रीडा कार्यालयाच्या गोडाऊनकडे गेले नाही. युवराज नाईक सध्या पुणे विभागाच्या क्रीडा उपसंचालक पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे आता याची चौकशी कोण करणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
खेळण्यायोग्य नसल्यामुळे वाटप नाही
याबाबत सोलापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले राहिलेल्या फुटबॉलचे तेव्हाच वाटप होणे गरजेचे होते. आम्हाला लक्षात आल्यानंतर हे फुटबॉल आम्ही वाटप करण्याचा प्रयत्न केला. परंतु हवा भरल्यानंतर ते फुटबॉल फुटतात. ते खेळण्यायोग्य फुटबॉल नसल्यामुळे आम्ही या फुटबॉलचे वाटप केले नाही.