
गटका खेळात महाराष्ट्र संघाला पहिल्यांदा रौप्य पदक

गया : अपेक्षेप्रमाणे सातव्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेतील देशी खेळात महाराष्ट्राचा विजयाचा झेंडा फडकतच राहिला. मल्लखांबात निशांत लोखंडेच्या सुवर्णासह २ रौप्य १ कांस्य, तर गटका खेळात प्रथमच महाराष्ट्राने रौप्य पदक जिंकण्याचा करिश्मा घडविला.

मल्लखांब मैदानात मराठमोळ्या क्रीडापटूंनी सलग तिसर्या दिवशी पदकांची लयलूट केली. टांगता मल्ल्खांब प्रकारात मुंबईच्या निशांत लोखंडेने महाराष्ट्रासाठी सुवर्ण यशाचे खाते उघडले. ८.५० गुणांची कमाई करीत निशांतने सुवर्णयशाला गवसणी घातली. वैयक्तिक सर्वसाधारण मुलांच्या गटात मुंबईच्या निशांत लोखंडेने २५ गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. मध्य प्रदेशच्या देवेंद्र पाटीदार व यतीन कोरी यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदके पटकावली. निशांत याने पदकाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. सांघिक गटात निशांत हा रौप्य पदकाचा मानकरी ठरला होता.

मुलींच्या सांघिक गटात तनश्री जाधव, आर्या साळुंके, सई शिंदे, तन्वी दवणे, हदया दळवी व हिरण्या कदम यांनी रौप्यपदकाची कमाई केली. वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात आर्या साळुंकेने रौप्य, तर तनश्री जाधवने कांस्य पदकाची कमाई करीत स्पर्धेतील दुसरे पदकावर नाव कोरले.
पंजाबमधील पारंपारिक गटका खेळात गेल्या दोन स्पर्धेत महाराष्ट्राला पदकाने हुलकावणी दिली होती. यंदा मुलींच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राने रूपेरी यश संपादन केले. उपांत्यपूर्व फेरीत मध्यप्रदेशवर ७०-५८, उपांत्य लढतीत तामिळनाडूवर ७०-५४ गुणांनी महाराष्ट्राने दणदणीत विजय संपादून पदक निश्चित केले होते. सेजल गालिंदे, तन्मयी पाटील व श्रमिका पाटील यांच्या संघाने अंतिम लढतीत झारखंडकडून ४५-८१ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. हाताला सूज असताना देखील माघार न घेता पुण्याच्या सेजल गालिंदे हिने सुवर्ण पदकाची शर्थ केली. ती अपुरी ठरली. आरती चौधरी, मंथन पवार व आकाश थोरात यांच्या मार्गदर्शनाद्वारे महाराष्ट्राच्या संघाने प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेत पदकाचे खाते उघडण्याची किमया घडविली आहे.