राळेगाव येथे शुक्रवारपासून राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा 

  • By admin
  • May 8, 2025
  • 0
  • 38 Views
Spread the love

यवतमाळ ः राळेगाव येथे नवोदय क्रीडा मंडळातर्फे ९ ते ११ मे या कालावधीत राजीव गांधी तालुका क्रीडा संकुल येथे ओपन राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय व्हॉलिबॉल ओपन स्पर्धेत ऑरेंज सिटी नागपूर, मंचूरियन तेलंगणा, इन्कम टॅक्स मुंबई, एसबीएम परतवाडा, काटन सिटी यवतमाळ, डेंजरस चेन्नई, भारती विद्यापीठ पुणे, नागपूर पोलिस असे आठ संघ सहभागी झाले आहेत.

या राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघाला ५० हजार रुपये रोख पुरस्कार दिला जाणार आहे. हे पारितोषिक प्रा वसंत पुरके, प्रफुल मानकर यांच्याकडून देण्यात येणार आहे.  द्वितीय पुरस्कार ४० हजार रुपये ठेवण्यात आले आहे. हे पारितोषिक अरविंद वाढोणकर, नंदू गांधी, राजेंद्र दूध पोळे यांच्याकडून ठेवण्यात आले आहे. तृतीय क्रमांक ३० हजार रुपये रोख राजेंद्र तेलंगे, प्रदीप ठाणे, राजेंद्र नागतूरे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. चतुर्थ बक्षीस २० हजार रुपये रोख मनीष गांधी, राजेश अग्रवाल यांच्याकडून देण्यात येणार आहे.

तसेच व्हॉलिबॉल स्पर्धेत बेस्ट स्मॅशर, बेस्ट सेंटर, बेस्ट लिबेरो, बेस्ट ऑल राऊंडर, मॅन ऑफ द मॅच, असे प्रत्येकी २५०० रुपये सचिन त्रिपदवार, शुभम ठाकरे, हिंडोचा ब्रदर्स, रवींद्र शेराम, बंडू लोहकरे यांच्याकडून वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यातील बेस्ट प्लेयर ला मॅन ऑफ द मॅच मन्नत मोबाईल शॉप यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. यावेळी व्हॉलीबॉल स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंची भोजन व्यवस्था मॉर्निंग ग्रुप गार्डन राळेगावच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी विविध संघटनांनी सहकार्य केले आहे. 

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला खासदार संजय देशमुख, आमदार बाळासाहेब मांगुळकर, प्रा वसंत पुरके, अॅड प्रफुल मानकर, अरविंद  वाढोणकर, रवींद्र शेराम, जानराव गिरी, विनय मुनोत, संजय पोपट आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. राळेगाव तालुक्यातील नागरिकांनी या राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन नवोदय क्रीडा मंडळ व यवतमाळ जिल्हा पासिंग व्हॉलिबॉल संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *