
नांदेड ः भागलपूर (बिहार) येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात नांदेडच्या ज्ञानेश बालाजी चेरले याने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले.
अगदी लहान वयातच मोठा भाऊ मार्तंड याच्या पावलावर पाऊल ठेवून आई-वडिलांच्या प्रोत्साहनाने नांदेड जिल्ह्याच्या सचिव आणि प्रशिक्षक वृषाली पाटील जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानेशने तिरंदाजीत झेप घेतली. यावर्षी झालेल्या शालेय स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटात खेळताना ज्ञानेश याने एक रौप्यपदक आणि दोन कांस्यपदक मिळवत बिहार येथे होणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले.

या स्पर्धेत ज्ञानेशने ७२० पैकी ६५१ गुण मिळतून तिसरे स्थान तर महाराष्ट्राच्या मुलांपैकी प्रथम स्थान मिळवले. मुलींमध्ये शर्वरी शेंडे हिने ६६७ गुण घेत प्रथम स्थान मिळविले. ज्ञानेश्वरीच्या मिश्र टीमने आंध्र प्रदेश व हरियाणा सारख्या बलाढ्य टीमला सहजपणे नमवत सुवर्णपदकावर महाराष्ट्राचे नाव कोरले. ज्ञानेशने मागील दोन वर्षांत सीनियर, ज्युनिअर व शालेय स्पर्धांमध्ये नांदेड जिल्ह्याचे नाव राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकवले आहे. तसेच २०२३-२४ ला युथ एशियन स्पर्धेतही कॅडेट गटात तैवान येथे त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्या या यशाचे कौतुक करीत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या छत्रपती संभाजीनगर येथील साई केंद्रात त्याची निवड केली व त्यास खेलो इंडिया स्कॉलरशिप दिली.

राष्ट्रीय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला नुकतेच दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते दोन लाख पन्नास हजार रुपयांचे साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्याने मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे जिल्हा संघटना प्रशिक्षक वृषाली पाटील जोगदंड, आई धनरेखा चेरले, वडील बालाजी चेरले कार्याध्यक्ष डॉ हंसराज वैद्य, आमदार भीमराव केराम, मुख्याध्यापक कृष्णा नेमानिवार, मुकुंदराव तिरमनवार, गोवर्धन मुंडे, नरसिंग यड्रलवार, साई नालीवार , जिल्हा संघटना कोषाध्यक्ष सुरेश तमलूरकर, सदस्य राष्ट्रपाल नरवाडे, पोलिस निरीक्षक तानाजी चेरले, नांदेड तालुका अध्यक्ष श्रीनिवास भुस्सेवार, उपाध्यक्ष मुन्ना कदम कोंडेकर, मालू कांबळे, शिवाजी पुजरवाड, माधव दुयेवाड, संजय चव्हाण, ॲड अरुण फाजगे, सतीशकुमार जाधव, विष्णू जगळपुरे, संतोष कनकावार, चंद्रप्रकाश होनवडजकर, शिवाजी अंबुलगेकर, ऑलिम्पिक संघटना उपाध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपीले, कोषाध्यक्ष प्रा जयपाल रेड्डी, प्रलोभ कुलकर्णी, सहसचिव डॉ राहुल वाघमारे, डॉ राजेश जांभळे, बालाजी जोगदंड, विष्णू जगळपूरे यांच्यासह अनेकानी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.