
छत्रपती संभाजीनगर अंडर १४ प्रीमियर लीग क्रिकेट ः श्री गिऱ्हे सामनावीर
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सानिया मोटर्स संघाने एमई वॉरियर्स संघावर आठ विकेट राखून दणदणीत विजय नोंदवला. श्री गिऱ्हे याने सामनावीर पुरस्कार पटकावला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेचे आयोजन युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल पाटील व जाधव क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक संदीप जाधव यांनी केले आहे. या सामन्यात सानिया मोटर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवला. एमई वॉरियर्स संघ १४.४ षटकात अवघ्या ४८ धावांत सर्वबाद झाला. या धावसंख्येच्या पाठलाग करताना सानिया मोटर्स संघाने अवघ्या ६.५ षटकात दोन बाद ४९ धावा फटकावत आठ विकेटने सामना जिंकला.

कमी धावसंख्येच्या या लढतीत यज्ञ राजपूत याने २३ चेंडूत २४ धावा फटकावल्या. त्याने चार चौकार मारले. अर्जुन शेळके याने ३६ चेंडूत चार चौकारांसह २० धावा काढल्या. स्वरित मांटे याने १२ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. त्याने तीन चौकार मारले.
गोलंदाजीत श्री गिऱ्हे याने प्रभावी गोलंदाजी करताना अवघ्या ९ धावांत पाच विकेट घेऊन सामना गाजवला. हर्षद शिंदे याने १२ धावांत तीन गडी बाद केले. रितेश घाडगे याने ५ धावांत एक बळी मिळवला.
संक्षिप्त धावफलक
एमआय वॉरियर्स ः १४.४ षटकात सर्वबाद ४८ (अर्जुन शेळके २०, स्नेहल मगर ५, प्रचिती कुलकर्णी ६, विशाल ५, श्री गिऱहे ५-९, हर्षद शिंदे ३-१२, रितेश घाडगे १-५) पराभूत विरुद्ध सानिया मोटर्स ः ६.५ षटकात दोन बाद ४९ (यज्ञ राजपूत नाबाद २४, स्वरित मांटे नाबाद १८, रिदम साहुजी १-७, जिशान शेख १-११). सामनावीर ः श्री गिऱ्हे.