छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० क्रिकेट लीग ः श्री गिऱ्हे, वीरेन डहाळेची लक्षवेधक कामगिरी
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर अंडर १४ टी २० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत सानिया मोटर्स संघाने छत्रपती फायटर्स संघाचा चार गडी राखून पराभव करत स्पर्धेतील सलग दुसरा विजय साकारला. या लढतीत गोलंदाजी प्रभावी कामगिरी करणारा श्री गिऱ्हे याने सामनावीर पुरस्कार मिळवला.
गरवारे क्रिकेट स्टेडियमवर या स्पर्धेचे आयोजन युनिव्हर्सल क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक राहुल पाटील व जाधव क्रिकेट अकादमीचे मुख्य प्रशिक्षक संदीप जाधव यांनी केले आहे. या सामन्यात सानिया मोटर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती फायटर्स संघाला २० षटकात आठ बाद ११४ धावांवर रोखण्यात सानिया मोटर्सचे गोलंदाज यशस्वी ठरले. सानिया मोटर्स संघाला विजयासाठी ११५ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना सानिया मोटर्स संघाने १८ षटकात सहा बाद ११८ धावा फटकावत चार विकेट राखून विजय मिळवला.
या सामन्यात वीरेन डहाळे याने आक्रमक ७० धावा फटकावल्या. वीरेन याने दमदार फलंदाजी करत ४३ चेंडूत ७० धावा काढल्या. त्यात त्याने ११ चौकार मारले. अर्णव गिरी याने २२ चेंडूत ३६ धावांची वेगवान खेळी केली. त्याने सहा चौकार व एक षटकार मारला. मानव लिखे याने पाच चौकारांसह ३३ धावांची जलद खेळी केली.
गोलंदाजीत सानिया मोटर्स संघाच्या श्री गिऱ्हे याने सलग दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीतील आपली चमक पुन्हा एकदा दाखवली. त्याने २० धावांत चार गडी बाद करुन संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. वीरेन डहाळे याने १९ धावांत तीन गडी बाद करत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. रितेश घाडगे याने २३ धावांत दोन बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
छत्रपती फायटर्स ः २० षटकात आठ बाद ११४ (देवव्रत पवार १०, सत्यजीत १९, वीरेन डहाळे नाबाद ७०, पार्थ चव्हाण ७, श्री गिऱ्हे ४-२०, रितेश घाटगे २-२३, हर्षद शिंदे १-२६) पराभूत विरुद्ध सानिया मोटर्स ः १८ षटकात सहा बाद ११८ (यज्ञ राजपूत १२, श्रावणी निटूरकर १४, मानव लिखे ३३, अर्णव गिरी नाबाद ३६, वरुण जगदाळे नाबाद २, इतर १७, वीरेन डहाळे ३-१९, मयूर सोमासे १-१६, आयुष गायकवाड १-१७). सामनावीर ः श्री गिऱ्हे.