महाराष्ट्राच्‍या पदकांचा सुवर्णमहोत्‍सव

  • By admin
  • May 8, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

सिद्धेश घोरपडेची पदक हॅटट्रिक, टेबल टेनिसमध्ये दुहेरी सुवर्ण कामगिरी

राजगीर : पदक तक्‍यात अव्‍वल स्‍थान कायम राखत महाराष्ट्राने सातव्‍या खेलो इंडिया युवा स्‍पर्धेत गुरुवारी ५१ पदकांचा पल्‍ला पार करत पदकांचा सुवर्ण महोत्‍सव साजरा केला. टेबल टेनिस प्रकारात दुहेरीत सुवर्णपदक जिंकत महाराष्ट्राच्‍या मुलींनी स्‍पर्धेतील ५० वे पदक जिंकले. त्‍यापूर्वी पुण्याच्या सिद्धेश घोरपडेने सलग तिसऱ्या दिवशी पदक जिंकत पदकांची हॅटट्रिक साजरी केली.

खेलो इंडिया स्‍पर्धेत सर्वप्रथम पदकांचे अर्धशतक झळकविण्याची हॅटट्रिक करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्‍य ठरले आहे. स्‍पर्धेच्‍या पाचव्‍या दिवशी २० सुवर्ण, १६ रौप्‍य व १५ कांस्यपदकांची लयलूट करून महाराष्ट्राने अव्‍वल स्‍थान कायम राखले होते. गुरुवारी संपलेल्‍या सायकलिंग, मल्‍लखांब स्‍पर्धेत महाराष्ट्राने सुवर्ण सांगता केली. दिल्‍लीत संपलेल्‍या सायकलिंग स्‍पर्धेत ३ सुवर्ण २ रौप्‍य व १ कांस्य पदकाची लयतूट करीत महाराष्ट्राने उपविजेतेपद पटकावले. गयातील मल्‍लखांब स्‍पर्धेत२ सुवर्ण ५ रौप्‍य व २ कांस्य अशी ९ पदके महाराष्ट्राने कमवून उपविजेतेपदावर नाव कोरले.जलतरणात सर्वाधिक १९ पदके महाराष्ट्राने जिंकली आहे. आर्चरीतील ६ सुवर्णासह ९ पदकांचा विक्रमी कामगिरी महाराष्ट्राने केली आहे.

सायकलिंगमध्ये पुण्याच्या सिद्धेश घोरपडेने सलग तिसऱ्या दिवशी पदक जिंकत पदकांची हॅटट्रिक साजरी केली. ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत गुरुवारी अखेरच्या दिवशी मराठमोळ्या सिद्धेश घोरपडे याने केरिन रेसमध्ये बाजी मारत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. झारखंडच्या बिकाश ओरेन याने रौप्य पदक जिंकले, तर तेलंगणाच्या थानिश कुमार सिंगला कांस्यपदक मिळाले.

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये ही ट्रॅक सायकलिंग स्पर्धा पार पडली. सिद्धेश घोरपडे याने पहिल्या दिवशी स्क्रॅचरेस इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकून आपल्या मोहिमेचा श्रीगणेशा केला होता. मग दुसऱ्या दिवशी त्याने ट्रॅक सायकलिंगच्या इंडिव्हिजल परशूट प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. गुरुवारी त्याने पुन्हा एकदा सोनेरी यशाने मोहिमेची सांगता केली.

नव्‍याने उभारण्यात आलेल्‍या राजगीर क्रीडा संकुलात महाराष्ट्राच्‍या मुलींच्‍या संघाने दुहेरीत सुवर्ण पदक जिंकून टेबल टेनिस मधील पदकाचे खाते उघडले. महाराष्ट्राच्‍या काव्‍या भट व दिव्‍याश्री भौमिकने पश्चिम बंगालच्‍या अविशा कर्माकर व शुभाक्रिता दत्तचा ११-६, ११-९, ११-७ गेमने पराभव करीत पर्दापणातच सुवर्ण यशाला गवसणी घातली. यजमान बिहार व उत्तरप्रदेश संघाला पराभूत करून काव्‍या – दिव्‍याश्री जोडीने अंतिम फेरीत मजल मारली होती.

अंतिम लढतीत डावखुऱ्या काव्‍या भटने जोरदार स्‍मॅशेस घेत सुरूवातीपासून महाराष्ट्राने आघाडी घेतली होती. दुसऱ्यागेममध्ये बंगालच्‍या खेळाडूंनी चिवट झुंज देण्याचा प्रयत्‍न केला. काव्‍या -दिव्‍याश्रीनेआक्रमक खेळी करीत पर्दापणातच सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. चेन्‍नई येथील खेलो इंडियात काव्‍या तर दिव्‍याश्री बंगळुरूमध्ये सराव करीत असते. खेलो इंडिया योजनेमुळे माझा खेळ उंचविला यामुळेच मी पदक विजेती ठरली असून, आता एकेरीतही मला पदक जिंकायचे असल्‍याचे काव्‍याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *