
नवी दिल्ली : पुण्याच्या शांभवी क्षीरसागर हिने सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत नेमबाजीतील १० मीटर एअर रायफलमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले.

गत स्पर्धेत रिकाम्या हाताने परतलेल्या शांभवी हिने यावेळी मात्र, सुवर्णवेध साधला.नवी दिल्लीतील कर्णी सिंग शुटिंग रेंजवर शांभवी क्षीरसागर हिने यावेळी अतिशय शांतचित्ताने खेळ केला. संपूर्ण स्पर्धेत परफेक्ट टेन लावणारी ती एकमेव नेमबाज ठरली. शांभवीने सर्वाधिक २५१.३ गुणांसह सुवर्णपदकावर मोहर उमटवली. पंजाबच्या लावण्या रावत हिनेही शांभवी हिला तुल्यबळ लढत दिली. मात्र, २४९.६ गुणांसह तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कर्नाटकची हृदया कोंडूर २२८.८ गुणांसह कांस्यपदकाची मानकरी ठरली.
शांभवी क्षीरसागर ही पुण्यातील खेळाडू असून, ती फर्ग्युसन महाविद्यालयात शिकते. गतवेळी चेन्नईतील खेलो इंडिया स्पर्धेत ती अपयशी ठरली होते. आधी कोल्हापूरमध्ये सराव करायची मात्र, आता वर्षभरापासून ती पुण्यात सराव करते. मागील दोन महिन्यापासून शांभवी हिने दिल्लीत सराव केला. अखेर यंदाच्या खेलो इंडिया सुवर्ण पदकाच्या रूपाने तिला फळ मिळाले. दीक्षांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शांभवीने हे सोनेरी यश संपादन केले.