
मुंबई : बिलियर्ड्सच्या मैदानात आपले अनभिषिक्त सम्राटपद कायम राखत दिग्गज पंकज अडवाणीने सीसीआय बिलियर्ड्स क्लासिक विजेतेपदाची दिमाखदार हॅटट्रिक पूर्ण केली.
विल्सन जोन्स बिलियर्ड्स हॉलमध्ये झालेल्या थरारक अंतिम सामन्यात अडवाणीने अनुभवी ध्रुव सितवालावर ५-२ असा दणदणीत विजय मिळवत पुन्हा एकदा सीसीआयच्या रंगमंचावर आपली अढळ अधिराज्याची मोहोर उमटवली.
सामन्याच्या सुरुवातीला पंकजला अपेक्षित सूर सापडला नव्हता. पहिल्या आणि तिसऱ्या फ्रेममध्ये सितवालाने आक्रमक खेळ करत २-१ अशी आघाडी घेतली. पण इथेच अडवाणीचा अनुभव आणि आत्मविश्वास कामी आला. त्याने चौथ्या फ्रेममध्ये १४५ गुणांचा जबरदस्त ब्रेक नोंदवत बरोबरी साधली आणि तिथून पुढे मागे वळून न पाहता सलग चार फ्रेम जिंकून ५-२ असा निर्णायक विजय मिळवला.
सीसीआय क्यू-स्पोर्ट्सचा राजा ही पदवी पुन्हा अडवाणीने मिळवली. २८ वेळचा जागतिक विजेता असलेला हा खेळाडू अंतिम क्षणी जेव्हा गरज असते, तेव्हा कस कसून खेळ कसा उंचावतो, याचे हे सर्वोत्तम उदाहरण ठरले.
या विजयामुळे अडवाणीला सीसीआय ट्रॉफी आणि २.५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले. उपविजेता ध्रुव सितवालाला १.५ लाख रुपयांची बक्षीस रक्कम देऊन गौरवण्यात आले.
विजयानंतर आनंदी अडवाणीने भावूक प्रतिक्रिया देताना सांगितले, “हे जेतेपद माझ्यासाठी विशेष आहे. स्पर्धेतील प्रत्येक सहकारी खेळाडूने दिलेली टक्कर आणि सीसीआयचे उत्कृष्ट आयोजन यामुळेच हे शक्य झाले.”