सोलापूर येथे मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबिरांकडे दुर्लक्ष

  • By admin
  • May 9, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

विविध जिल्हा संघटनांची शिबीरे, लेबल मात्र क्रीडा कार्यालयाचे

ए. बी. संगवे

सोलापूर ः सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिरास शहरातील विविध ठिकाणी पाच मे पासून सुरुवात झाली आहे. सध्या कार्यालयाकडे एकही शासकीय प्रशिक्षक नाही. परंतु त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी कार्यरत आहे. तो अधिकारी स्वतः ही प्रशिक्षण केंद्र चालविणार? का कोणावर नियंत्रण ठेवणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

विविध जिल्हा क्रीडा संघटनेच्या सहकार्याने २० मे पर्यंत विविध जिल्हा संघटनेच्या खेळाडूंचा सराव चालणाऱ्या ठिकाणीच ही शिबीरे सुरू झाली आहेत. विविध जिल्हा क्रीडा संघटनेचा अथवा त्या क्लबचा सराव. परंतु त्यावर लेबल मात्र, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे, अशी स्थिती क्रीडा कार्यालयाची झाली आहे. एकूणच शासनाचा उपक्रम पार पाडायचा म्हणून ही शिबीरे सुरू झाली आहेत का? का केवळ खर्ची टाकण्यासाठी? असा प्रश्न क्रीडाप्रेमींमध्ये व्यक्त केला जात आहे.

ज्या त्या जिल्हा संघटनेने अथवा क्लबने आपापल्या सोयीच्या ठिकाणी पाच मे पासून ही शिबिरे सकाळी ६.३० ते ८.३० व सायंकाळी  ४.३० ते ६.३० या वेळेत सुरू केली आहेत. शासनाचे जे प्रशिक्षक ज्या जिल्ह्यात कार्यरत आहेत त्या खेळाची जिल्हा प्रशिक्षण केंद्रे असतात. त्या खेळांच्या शिबिराबरोबरच अन्य खेळांची १४ वर्षांखालील गटातील विद्यार्थ्यांची ही शिबीरे आयोजित करण्याच्या राज्य शासनाच्या क्रीडा खात्याच्या सूचना आहेत. यातून त्या प्रशिक्षण केंद्रास कायमस्वरूपी उदयोन्मुख खेळाडू मिळतात.

वेतन सोलापूरचे, काम पुण्याचे
सोलापुरात गणेश पवार ॲथलेटिक्स  व वैशाली सूळ हॉकी या दोन खेळाचे प्रशिक्षक कार्यरत होते. परंतु यातील गणेश पवार यांची पदोन्नतीवर तुळजापूर तालुका क्रीडा अधिकारी म्हणून तर वैशाली सूळ या डेप्युटेशनवर पुणे येथे गेल्यामुळे जिल्हा क्रीडा कार्यालयात सद्यस्थितीत एकही शासकीय प्रशिक्षक नाही. सूळ या वेतन सोलापूरचे घेतात. परंतु काम मात्र पुण्याचे करतात. अशी स्थिती असेल तर सोलापुरातून खेळाडू कसे घडणार? त्यामुळे सोलापूरला शासकीय प्रशिक्षक मिळण्यासाठी विविध क्रीडा संघटकानी लोकप्रतिनिधीमार्फत  प्रयत्न करणे गरजेचे आहे

खेळाडू कोट्यातून नियुक्ती केलेल्यांचे दुर्लक्ष
मोठ्या थाटात नेहरूनगर शासकीय मैदानावर उद्घाटन झालेल्या या क्रीडांगणावर ॲथलेटिक्स, खोखो व कबड्डीचे प्रशिक्षण शिबिर नेहरूनगर शासकीय मैदान सुरू आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार व मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी दत्तात्रय वरकड हे सांगतात. परंतु, खो-खो व कबड्डीचे शिबिरे प्रत्यक्षात सुरू झालेले नाहीत. खो-खोसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातील तालुका क्रीडा अधिकारी व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या सुप्रिया गाढवे व नुकतीच सरळ सेवेतून नियुक्ती केलेली राष्ट्रीय खेळाडू मयुरी पवार यांचे मार्गदर्शन सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे. परंतु या दोघीही मैदानावर येत नाहीत. रोज मैदानावर खेळाडू येतात आणि चौकशी करून जातात. त्यांना सांगायला पण कोणी नाही.

शिबिरांचे ठिकाण व प्रशिक्षक 

अॅथलेटिक्स : नेहरूनगर शासकीय मैदान (सूर्याजी लिंगडे) व शहर पोलिस मुख्यालय मैदान (दशरथ गुरव)

धनुर्विद्या :  जिल्हा क्रीडा संकुल (दीपक चिकणे)

व्हॉलिबॉल : एच डी प्रशाला (अनिल गिराम).

हॉकी : एम ए पानगल (जरार कुरेशी )

तलवारबाजी : शिवाजी रात्र प्रशाला (पवन भोसले).

 कुस्ती : श्रीकृष्ण केंद्र (भरत मेकाले).

 फुटबॉल : वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय (किरण चौगुले).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *