सोलापूर संघाचा हिंगोलीवर डावाने विजय

  • By admin
  • May 9, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

एमसीएम क्रिकेट ः दर्शील फाळकेचा अष्टपैलू खेळ तर सोहम कुलकर्णीचे ६ बळी

सोलापूर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या १६ वर्षांखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत दर्शील फाळकेचा (९ बळी व ५५ धावा) अष्टपैलू खेळ आणि सोहम कुलकर्णीच्या ६ बळींच्या जोरावर सोलापूरने हिंगोलीवर एक डाव राखून ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवित सात गुण वसूल केले. या सामन्यासह गुणतक्त्यात सोलापूर संघ १५ गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकावर आहे. सोलापूरचा पुढील सामना १० व  ११ मे रोजी छत्रपती संभाजीनगर संघाबरोबर होईल.

छत्रपती संभाजीनगर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील दोन दिवसाच्या सामन्यात पहिल्या दिवशी हिंगोली संघाच्या ८ बाद १०३ धावा असताना जोरात झालेल्या पावसाने दिवसभराचा खेळ होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी हिंगोलीने सर्वबाद १०८ धावा केल्या. यात हिंगोली संघाकडून सोहम सगर याने ४६ धावा केल्या. सोलापूरकडून दर्शील फाळके याने २६ धावांत ६ बळी तर सोहम कुलकर्णी याने ३० धावात ३ बळी टिपले. श्रवण माळी याने २२ धावात १ गडी बाद केला.

सोलापूरने पहिला डाव ३ बाद २९० धावांवर घोषित केला. यात सोलापूरकडून दर्शील फाळके याने ५५ व संदेश गाडे याने ५९, कर्णधार विरांश वर्मा ४० व अभिजीत सरवदे याने नाबाद २४ धावा केल्या. पहिल्या डावात सोलापूरने हिंगोलीवर १३९ धावांची आघाडी घेतली.

हिंगोलीचा दुसरा डाव सोलापूरने ८५ धावांत गुंडाळला. हिंगोली संघाकडून सोहम सगर याने ३८ धावा केल्या. सोलापूर संघाकडून सोहम कुलकर्णी याने २३ धावात, दर्शील फाळके याने २८ धावांत तर सार्थक कन्ना याने ८ धावांत प्रत्येकी ३ बळी टिपले. श्रवण माळी याने २२ धावांत १ गडी बाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *