
वाशीमध्ये कॅरमचा महामेळा, राज्यभरातील ५५० हून अधिक खेळाडूंचा सहभाग
नवी मुंबई : महाराष्ट्राच्या कॅरम चाहत्यांना उत्साहात भिजवणारी आणि खेळाडूंना आपली चमक दाखवण्याची सुवर्णसंधी देणारी ५९वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा शनिवारपासून (१० मे) वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या सभागृहात रंगणार आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार असून, यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा आणि आजी-माजी विश्वविजेत्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे उपाध्यक्ष विजय एस पाटील यांनी दिली.
या स्पर्धेत सागर वाघमारे (पुणे) व समृद्धी घाडीगावकर (ठाणे) अनुक्रमे पुरुष व महिला गटात अग्रमानांकित आहेत. राज्यभरातील ५५० हून अधिक खेळाडू, पंच व पदाधिकारी या स्पर्धेत सहभागी होत असून, स्पर्धेच्या स्वरूपाला आंतरराष्ट्रीय दर्जा लाभला आहे.
भव्य बक्षिसांची लयलूट
विजेत्या खेळाडूंना २ लाखांचे रोख बक्षिस, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवर मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत समालोचनासह करण्यात येणार आहे.
महत्त्वाचे सहभागी खेळाडू
पुरुष गट : सागर वाघमारे, महम्मद घुफ्रान, प्रशांत मोरे
महिला गट : समृद्धी घाडीगावकर, आकांक्षा कदम, प्राजक्ता नारायणकर
ज्येष्ठ गट : बाबुलाल श्रीमाळी, मीनल लेले खरे
सांघिक गट : पुणे, मुंबई, ठाणे हे प्रमुख दावेदार