आरबीआय बँक शील्ड क्रिकेट स्पर्धेला शनिवारपासून सुरुवात

  • By admin
  • May 9, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आरबीआय स्पोर्ट्स क्लब, मुंबई यांच्या वतीने आयोजित होणारी ६३वी सर बेनेगल रामा राव आरबीआय बँक शील्ड क्रिकेट स्पर्धा १० मे २०२५ पासून खेळवली जाणार असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्लेट ग्रुपसाठीची स्पर्धा १० मेपासून सुरू होणार असून त्यात १८ बँक/ऑफिस संघ मैदानात उतरणार आहेत. यानंतर १३ मेपासून एलिट ग्रुप फेरीला प्रारंभ होईल, ज्यात ६ संघ सहभागी होणार आहेत. या दोन्ही गटांमधून एकूण २४ बँक/ऑफिस संघ स्पर्धेत भाग घेतील आणि जवळपास ४०० खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

भारतीय क्रिकेटमधील अनेक कसोटी आणि प्रथमश्रेणी खेळाडूंनी या स्पर्धेत खेळले असल्याने आरबीआय बँक शील्ड स्पर्धेचा एक वैभवशाली इतिहास आणि समृद्ध वारसा आहे. फक्त क्रिकेटपुरती ही स्पर्धा मर्यादित नसून, आरबीआय स्पोर्ट्स क्लब या स्पर्धेद्वारे देशभरातील तरुण क्रिकेटपटूंना खेळाच्या माध्यमातून नोकरीच्या संधी देण्याचे एक महत्त्वाचे सामाजिक कार्यही करत आहे. त्यामुळे ही स्पर्धा म्हणजे खेळ आणि करिअर यांचं सुंदर समीकरण ठरते.

आरबीआय बँक शील्ड २०२५ मध्ये कोणता संघ चमकतो आणि कोणते नवे चेहरे उदयास येतात, याकडे आता सगळ्या क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *