
मुंबई : मुंबईच्या स्टायलिश क्यू मास्टर इशप्रीत सिंग चढ्ढाने चौथ्या एनएससीआय बॉल्कलाइन अखिल भारतीय स्नूकर स्पर्धेत इतिहास घडवत सर्वांची मने जिंकली! उपउपांत्यपूर्व फेरीत पुष्पेंदर सिंगचा ६-१ असा धुव्वा उडवताना इशप्रीत याने पाचव्या फ्रेममध्ये झळकावलेला १४७ गुणांचा परिपूर्ण ब्रेक हा क्षण भारतीय स्नूकर इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला.
एनएससीआय डोम, मुंबई येथे सुरू असलेल्या या ३२ लाख रुपयांच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत गुरुवारी इशप्रीतने ११८ (१०५-१, ७४-२५, ८८ (६५)-९, ८२ (८२)-२०, १४७ (१४७), ४४-७८, ९१-२७ असा दणदणीत विजय मिळवला. १४७ गुणांचा ब्रेक ही केवळ परिपूर्णतेचीच नाही, तर खेळातील शिस्त, संयम आणि दर्जाचा परमोच्च ठसा आहे.
भारतातील केवळ तिसरा क्यूइस्ट ठरतो इशप्रीत-गीत सेठी (१९८८, गुंटूर) आणि आदित्य मेहता (२०१३, बंगळुरू व जर्मनी) यांच्यानंतर १४७ ब्रेक करणारा खेळाडू! इशप्रीतने यापूर्वीही सीसीआय स्नूकर क्लासिक २०२५ मध्ये अशीच कामगिरी करून खेळाची उंची सिद्ध केली होती.
स्पर्धेतील अन्य सामन्यांमध्ये चुरशीचे क्षण पाहायला मिळाले. दिग्विजय कडियन या २२ वर्षीय प्रतिभावान खेळाडूने एस श्रीकृष्णावर ६-३ असा विजय मिळवत जबरदस्त फॉर्म दर्शवला. सौरव कोठारीने देखील ध्वज हरियाला ६-१ने नमवत आपली ताकद दाखवून दिली.