
हृदान छाजेर ठरणार सर्वात लहान स्पर्धक
मुंबई : देशातील बुद्धिबळप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणारी अखिल भारतीय चेस मास्टर्स फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा येत्या १० ते १५ मेदरम्यान प्रतिष्ठित मुंबई चेस सेंटर, रशियन हाऊस, पेडर रोड येथे रंगणार आहे. सुमारे २२० बुद्धिबळपटू या सहा दिवसीय स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
या स्पर्धेतील खास आकर्षण ठरणार आहे तो फक्त ४ वर्षांचा हृदान छाजेर, अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बेचा विद्यार्थी. सर्वात कमी वयाचा स्पर्धक म्हणून तो मैदानात उतरणार असून अनेकांच्या नजरा त्याच्यावर असतील. या स्पर्धेत नवोदित खेळाडूंपासून ते अनुभवी दिग्गजांपर्यंत सर्व स्तरांतील बुद्धिबळपटूंना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे, त्यामुळे ही स्पर्धा केवळ एक रेटिंग इव्हेंट न राहता एक बुद्धिमत्तेचा महाउत्सव ठरणार आहे.
आंतरराष्ट्रीय आर्बिटर अजिंक्य पिंगळे यांच्यावर या स्पर्धेचे तांत्रिक पर्यवेक्षण आणि फिडे नियमांनुसार आयोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शकरीत्या पार पडेल, अशी अपेक्षा आहे. १० मेपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेकडे आता संपूर्ण देशातील बुद्धिबळ चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.