महाराष्ट्र खो-खो संघाची सलग सातव्‍यांदा सुवर्ण भरारी !

  • By admin
  • May 9, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

पदकाचा डबल धमाका, मुलांना सुवर्ण, मुलींना रौप्‍य

गया (बिहार) : महाराष्ट्राने आपली हुकूमत गाजवत सातव्‍या खेलो इंडिया यूथ गेम्स स्‍पर्धेत दोन्‍ही गटात सलग सातव्‍यांदा पदकाला गवसणी घातली. मुलांनी सुवर्ण, तर मुलींच्‍या संघाने रूपेरी यश संपादन केले. जलतरणात पदकाचा धडका कायम ठेवत रिलेमध्ये महाराष्ट्राने सुवर्णासह १ रौप्‍य व १ कांस्य पदकाची कमाई केली.

बिपार्ड मैदानावर संपलेल्‍या खो-खो स्‍पर्धेत महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. मुलांच्‍या गटात महाराष्ट्राने ओडिशा संघावर ३४-२५ गुणांनी मात करून सलग सातव्‍यांदा सुवर्ण पदक जिंकण्याचा पराक्रम केला. मुलींच्‍या गटात ओडिशा संघाकडून महाराष्ट्र ३१-३४ गुणांनी पराभूत झाला, केवळ ३ गुणांनी महाराष्ट्राचे सुवर्णपदक हुकले. या संघातील विश्वविजेत्‍या अश्विनी शिंदे हिने सलग चौथ्यांदा पदक जिंकण्याचा विक्रम देखील नोंदविला.

मुलांच्‍या गटात सुरूवातीपासून ओडिशा विरुद्ध महाराष्ट्राने आक्रमक खेळ केला. अचूक गडी टिपून संरक्षणात महाराष्ट्र आघाडीवर राहिला. जितेंद्र वासवे याने तब्बल २ मिनिटाची ड्रीम रन करीत ओरीसाला झुंजवलेपूर्वार्धात १६-१० गुणांनी आघाडी घेतल्‍यानंतर आशिष गौतम, राज जाधव व शरद घाडगे यांनी अष्टपैलू खेळ करीत पहिल्‍याच फेरीपासून विजयी वाटचाल सुरू केली होती. ९ गुणांनी विजय संपादून महाराष्ट्राने खेलो इंडियातील आपली सुवर्ण परंपरा कायम राखली. पदकवितरण समारंभानंतर गणपती बाप्‍पा मोरया, जय भवानी-जय शिवाजी जयघोष करण्यात आला.

मुलींच्‍या गटात महाराष्ट्राची आक्रमणात पिछेहाट झाल्‍याने ओडिशा संघाने बाजी मारली. अटीतटीच्‍या लढतीत पहिल्‍या मिनिटापासून महाराष्ट्राने चपळता दर्शवली. अमृता पाटील, सुहानी धोत्रे व प्रतिक्षा बिराजदार यांचा अष्टपैलू खेळ सामना जिंकण्यासाठी अपुरा ठरला. गडी बाद करण्यात अपयश आल्‍याने ओडिशा संघाने ३ गुणांनी विजेतेपद पटकावले. खेलो इंडिया स्‍पर्धेत महाराष्ट्राच्‍या मुलींचे हे सातवे पदक आहे. गत तामिळनाडू स्‍पर्धेत महाराष्ट्र चॅम्‍पियन ठरला होता.

जलतरण स्पर्धेत सुवर्णपदक
बिपार्ड जलतरण तलावावर सुरू असलेल्‍या जलतरणात मुलींच्या ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये महाराष्ट्राने सुवर्णपदकाचा सूर मारला. निशी रुहील, समाईरा मल्‍होत्रा, आदिती हेगडे, अल्फेया धनसुरा या संघाने ४ मिनिटे ३१.०९ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण कामगिरी केली. कर्नाटक संघाने रौप्य तर तामिळनाडूला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आदिती हेगडेने स्‍पर्धेत पदक जिंकण्याचा षटकार झळकविला आहे. ४ सुवर्ण २ रौप्‍य पदकाची सर्वाधिक पदकाची करिश्मा घडविला आहे.

१८ वर्षांखालील मुलींच्या २०० मीटर मिडले प्रकारात निशी रुहील (२:२९.६२ सेकंद) हिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. कर्नाटकच्या मानवी वर्माने (२:२८.०३ सेकंद) सुवर्णपदक पटकावले. मुलांच्या ८०० मीटर फ्रीस्‍टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या अथर्वराज पाटील (८.४२.१५ सेकंद) याला कांस्यपदाकवर समाधान मानावे लागले. निशी व अथर्वराजचे हे स्‍पर्धेतील दुसरे पदक आहे.

आपल्‍या पाल्‍याचे यश पाहण्यासाठी अनेक खेळाडूंचे आई-वडिल स्‍टेडियममध्ये हजर होते. महाराष्ट्रातील खेळाडूंचे पोस्‍टर प्रर्दशित करीत त्‍यांच्‍या पालकांनी त्‍यांना प्रोत्‍साहित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *