
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या पार्थ माने व शांभवी क्षीरसागर या जोडीने पात्रता फेरीपासून वर्चस्व गाजवित सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली.
नवी दिल्लीतील कर्णी सिंग शुटिंग रेंजवर शुक्रवारीही महाराष्ट्राचा सुवर्ण धमाका कायम राहिला. वैयक्तिक प्रकारात सोनेरी यश मिळविलेल्या शांभवी क्षीरसागर हिने पार्थ मानेच्या साथीत १० मीटर एअर रायफल प्रकारात पात्रता फेरीत निर्विवाद वर्चस्व गाजवित ६३४.९ गुणांसह अव्वल स्थानासह अंतिम फेरीत धडक दिली. मानांकनात कर्नाटक, उत्तर प्रदेश व बिहार या संघांना मागे टाकत महाराष्ट्र अव्वल स्थानावर राहिला.

सुवर्णपदकासाठी महाराष्ट्र व कर्नाटक लढत रंगली. पहिल्या फेरीपासूप अनुभवी पार्थच्या साथीने शांभवीने संयमी खेळी करीत अव्वल स्थान कायम राखले. शांभवी – पार्थ या महाराष्ट्रीय जोडीने १६ गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाचा वेध घेतला. कर्नाटकच्या प्रणव नरेन-हद्या कांदुर जोडीला १२ गुणांसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. बिहारच्या रूद्र प्रताप सिंह व दिव्या भह जोडीने उत्तर प्रदेशला १६-१४ गुणांनी पराभूत करत कांस्य पदकाच्या लढतीत बाजी मारली.
रायगडच्या पार्थ माने हे खेलो इंडिया स्पर्धेतील सलग दुसरे सवुर्णपदक आहे. उत्तराखंडातील राष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकणारा पार्थ शनिवारी वैयक्तिक प्रकरातही पदकासाठी सज्ज झाला आहे. नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला पार्थ युवा व वरिष्ठ गटात सुवर्णपदक. जिंकणारा एकमेव राष्ट्रीय खेळाडू ठरला आहे. पनवेलमध्ये सुमा शिरूर यांच्या लक्ष्य ॲकॅडमीत तर कसून सराव करीत असतो.